प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढत; उमेदवार जास्त असल्याने चुरस होणार
By admin | Published: April 7, 2016 11:38 PM2016-04-07T23:38:20+5:302016-04-07T23:56:18+5:30
कुडाळ नगरपंचायत निवडणूक : प्रभाग ५, ६ मधील स्थिती ; मतदारांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक--कुडाळ गावाकडून नगराकडे
रजनीकांत कदम --कुडाळ -नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ५ कुडाळेश्वरवाडी येथे तिरंगी लढत होणार असून प्रभाग क्र. ६ गांधी चौकमध्ये सात उमेदवार असल्याने येथील प्रत्येक उमेदवार हा विजयासाठी स्वत:कडे असलेली निश्चीत मते टिकवून अजून विरोधातील मते कशी स्वत:कडे ओढता येतील यासाठी जोरदार प्रयत्नशील असणार आहे. येथील उमेदवारांमध्ये जोरदार चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ५ कुडाळेश्वरवाडी या प्रभागात कुडाळेश्वर वाडी व शिवाजीनगराचा अंशत: भाग येत आहे. या प्रभागात खुला प्रवर्ग महिला असे आरक्षण पडले आहे. या प्रभागाची एकूण मतदार संख्या ही ७८६ असून यामध्ये पुरुष ४०१ तर महिला ३८५ मतदार आहेत.
या प्रभागातून कविता प्रसाद कुंटे (शिवसेना), अश्विनी दत्ताराम गावडे (काँग्रेस) व मृण्मयी चेतन धुरी (भाजप) अशा राजकीय तीन प्रमुख पक्षाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या प्रभागात नळपाणी योजनेचा प्रश्न घराघरात पोहचविणे, सार्वजनिक विहिरींचे नूतनीकरण करणे, उघडी गटारे, नादुरूस्त रस्ते, शौचालये, काही ठिकाणी बंदावस्थेत असलेले पथदीप, कचऱ्याचा प्रश्न, सांडपाणी व्यवस्था असे व इतर अनेक प्रश्न येथील प्रभागात आहेत.
एकंदरीत तिन्ही उमेदवार हे नवीन असले तरी ते प्रमुख राजकीय पक्षांच्या तिकिटावर उभे आहेत. त्यामुळे येथील राजकीय अस्तित्व टिकविण्याकरिता व विजय मिळवण्याकरिता प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार शर्तीचे प्रयत्न केले जाणार आहेत. कुडाळ पंचायत समितीच्या माजी सभापती शिल्पा घुर्ये यांचा हा पंचायत समिती मतदार संघ होता. आता त्या शिवसेनेत असून यामुळे शिवसेना उमेदवाराला त्यांचा फायदा निश्चित होवू शकतो.
कुडाळचे ग्रामदैवत असणाऱ्या या प्रभागातील समस्या व प्रश्न दूर करून येथील जनतेसाठी खऱ्या अर्थाने सोयी सुविधा देण्यासाठी जो पुढे येईल त्याचाच विजय या प्रभागात निश्चित होणार आहे.
प्रभाग क्र. ६ गांधी चौक हा ही प्रभाग कुडाळ शहराचा मध्यवर्ती प्रभाग असून या प्रभागात गांधी चौक, बाजारपेठ, प्रभावळकर वाडा या वाड्या येत आहेत. या प्रभागात ओबीसी पुरुष असे आरक्षण पडले आहे. येथील एकूण मतदार हे ६९८ एवढे असून पुरुष ३५५ तर महिला ३४३ मतदार आहेत.
या गांधी चौक प्रभागातून अनेक जणांना निवडणूक लढविण्याची इच्छा होती. त्यामुळे या प्रभागात बंडखोरी होण्याची दाट शक्यता होती. यामध्ये काही जणांनी तिकीट मिळाले नाही म्हणून उमेदवारी अर्ज भरले होते, काहीजण नाराज झाले होते. मात्र, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची बंडखोरी होवू नये याची पूर्णपणे दक्षता घेतली. यामुळे येथील बंडखोरीचे ग्रहण तूर्तास टळले. बंडखोरीचे ग्रहण या गांधी चौक प्रभागात सुटले असले तरी या प्रभागात राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मतविभाजन होण्याची भीतीही सर्वात जास्त अपक्षापासून आहे. कारण या प्रभागात तीन अपक्षाबरोबरच एक मनसे उमेदवाराचीही भर पडली असल्याने येथील लढतीची चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या प्रभागात अनंत धडाम (काँग्रेस), संजय भोगटे (शिवसेना), शशांक कुडाळकर (भाजप), सीताराम उर्फ बाबी बांदेकर (मनसे) हे राजकीय पक्षाच्यावतीने उभे राहिलेले उमेदवार आहेत तर अपक्ष म्हणून सम्राट कुडतरकर, पुष्पमदत्त स्वार, प्रसाद म्हाडेश्वर हे तीन उमेदवार आहेत.
या गांधी चौक प्रभागात शिवसेनेचे उमेदवार संजय भोगटे हे कुडाळ जिल्हा परिषद मतदार संघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.
हा प्रभाग मोठा तसेच समस्याही जास्त आहेत. या ठिकाणी काही सार्वजनिक विहिरीची झालेली दुरवस्था, उघडी व काही ठिकाणी बंदावस्थेत असलेली गटारे त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून रस्त्यावर येणे, पाणपोई, रस्ते, बाजारपेठेतील विद्युत खांबावरील विद्युत तारांचे वाढते जाळे त्यामुळे वाढत असलेला धोका, विद्युत तारा जमिनी खालून जाणे गरजेचे, नळपाणी योजना घरोघरी पोहचणे गरजेचे, रस्त्यावर वाढती अतिक्रमणे या समस्या वाढत आहे. वाढती वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था योग्यप्रकारे नाही, घनकचरा व्यवस्थापन असे अनेक प्रश्न समस्या या प्रभागात निर्माण होत आहेत.
सर्वांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
गांधी चौक प्रभागाची रचना ही मोठी असून या प्रभागात उभ्या राहिलेल्या सर्व उमेदवारांसाठी ही निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने येथील प्रत्येक उमेदवार हा स्वत:कडे असलेली मते कुठेही दुसरीकडे जाता नये यासाठी तसेच विरोधातली मते आपल्याकडे कशी येतील यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.
कुडाळेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण
या प्रभागात कुडाळचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वराचे मंदिर असून या मंदिराचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभित करणे आवश्यक आहे. तसेच याठिकाणी भक्त निवास बांधणे याचबरोबर इतरही सोयी सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.
सर्व उमेदवार नवीन
जवळपास कुडाळातील काही जेमतेम प्रभागातून सर्व उमेदवार हे एकदाही निवडणूक लढविलेले नसलेले उमेदवार आहेत. यामध्ये हा कुडाळेश्वरवाडी प्रभाग येत असून येथील निवडणूक लढविणारे तिन्ही पक्षाचे उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत हे विशेष होय.