जनताच नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरु देणार नाही; सतीश सावंतांचा इशारा
By सुधीर राणे | Published: October 20, 2022 02:37 PM2022-10-20T14:37:10+5:302022-10-20T15:15:19+5:30
भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की, जाधव यांच्या उपस्थित कणकवलीत शिवसेनेचा मेळावा होईल. आम्ही त्यांना पुन्हा येथे आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू.
कणकवली: आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार भास्कर जाधव यांच्याबद्दल असंसदीय शब्दात टीका केली आहे. त्यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्यावतीने करण्यात आली. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
तर, भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की, जाधव यांच्या उपस्थित कणकवलीत शिवसेनेचा मेळावा होईल. आम्ही त्यांना पुन्हा येथे आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू. आमदार नितेश राणे यांच्या वर्तनाने जनताच जिल्ह्यात यापुढे त्यांना फिरु देणार नाही असा इशारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला.
यापुढे भास्कर जाधव यांचा पुतळा जाळत कोण धमकी देत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आमदार नितेश राणेंवर गुन्हा केव्हा दाखल करणार? ज्या पद्धतीने आमदार जाधव यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल केला. त्याच पद्धतीने नितेश राणेंवर गुन्हा दाखल करावा. सरकार आले म्हणून कोणी कायदा हातात घेऊ शकत नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांनी केली. तर उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांनी राणे यांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने तक्रार अर्ज दिला.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी अध्यक्षा निलम पालव, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड, नगरसेवक कन्हैया पारकर, उत्तम लोके, विलास गुडेकर, दिव्या साळगावकर, सचिन आचरेकर आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.