गोपनीयतेचा भंग करणाऱ्या सतीश सावंतांवर गुन्हा दाखल करा, निलेश राणेंची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 07:44 PM2022-02-04T19:44:02+5:302022-02-04T19:44:27+5:30
ओरोस : शिवसेना नेते सतिश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायप्रवीष्ठ असलेल्या संतोष परब हल्लाप्रकरणातील पोलिसांकडील गोपनीय माहीती जाहीर ...
ओरोस : शिवसेना नेते सतिश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायप्रवीष्ठ असलेल्या संतोष परब हल्लाप्रकरणातील पोलिसांकडील गोपनीय माहीती जाहीर केली. यात त्यांनी ही गोपनीय माहीती उघड करीत गोपनीयतेचा भंग केला आहे. न्यायालयाचा अवमानही केला आहे, त्यामुळे सतीश सावंत याच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.
तसेच या तपासकामातील गोपनीय माहीती ज्या पोलीस अधिकार्यांनी दिली, त्याचीही चौकशी करावी अशीही मागणी केली. याबाबत सतिश सावंत यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आपण याप्रकरणी न्यायालयात दाद मागू असेही निलेश राणे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
शिवसेना नेते सतिश सावंत यांनी काल कणकवली शिवसेना शाखा येथे न्यायप्रवीष्ट असलेल्या संतोष परब हल्ला प्रकरणात जाहीर पत्रकार परिषद घेत त्यात पोलीस तपासातील काही गोष्टी मांडत गोपनीयतेचा भंग केला आहे. सदर पत्रकार परिषदेत सतिश सावंत यांनी २८ ऑगस्ट २०२१ पासून संतोष परबवर हल्ला करण्यासाठी सचिन सातपुते व नितेश राणे यांच्यामध्ये ओरोस येथे चर्चा झाल्याचे तपासामध्ये सिद्ध होत आहे.’ असा उल्लेख केला. त्या सोबतच सचिन सातपुतेच्या तपासात नितेश राणेंचा सहभाग असल्याचं उघड झालंय. असाही उल्लेख केला.
हा पोलीस तपासातील भाग असा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहिर करणे हा न्यायालयाचा अवमान आहेच, सोबतच ही माहिती खरी आहे असं म्हटल्यास ही महिती सतीश सावंत यांच्यापर्यंत कशी पोहीचली, कुठल्या अधिकाऱ्याने ती पोहचविली याची सखोल चौकशी व्हावी. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणातील गोपनीय माहिती सार्वजनिक करत न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सावंत यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा असेही या तक्रारीत नमूद केले आहे.