वेताळबांबर्डे अपघात मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 02:42 PM2020-06-09T14:42:40+5:302020-06-09T14:44:48+5:30
महामार्गावर फलक, योग्य दिशादर्शक चिन्हे आदी संरक्षक तरतुदी महामार्ग विभागाने व कंत्राटदार कंपनीने न केल्याने अपघात प्रकरणी त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे कुडाळ तालुका मनसेच्यावतीने कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली.
कुडाळ : महामार्गावर फलक, योग्य दिशादर्शक चिन्हे आदी संरक्षक तरतुदी महामार्ग विभागाने व कंत्राटदार कंपनीने न केल्याने अपघात प्रकरणी त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे कुडाळ तालुका मनसेच्यावतीने कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली.
चार दिवसांपूर्वी वेताळबांबर्डे येथे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडली होती. यानंतर मनसेने या अपघात प्रकरणी महामार्ग प्रशासन व दिलीप बिल्डकॉन कंपनीला दोषी धरले आहे.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळ तालुका शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील वाढत्या अपघातांबाबत कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांच्याशी चर्चा केली. महामार्गावर फलक, दिशादर्शक चिन्हे आदी संरक्षक तरतुदी महामार्ग विभागाने व कंत्राटदार कंपनीने न केल्याने त्यांना जबाबदार धरून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे मृतांना विमा, नुकसान भरपाई आदी सुविधा तत्काळ मिळण्यासाठी योग्य कार्यवाही व्हावी, अशी विनंती केली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, जिल्हा सचिव बाळा पावसकर, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ सचिव राजेश टंगसाळी, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, जगन्नाथ गावडे, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे व रामा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते