‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
By admin | Published: July 23, 2016 09:55 PM2016-07-23T21:55:03+5:302016-07-23T23:52:59+5:30
मनसेची मागणी : उत्तम पवार मृत्यूप्रकरण; रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरा : राजन दाभोलकर
कणकवली : महामार्गावरील खड्ड्यांमुळेच तलाठी उत्तम पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरण नियंत्रण मंडळ व अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व क्वालिटी कंट्रोल विभागही त्यास जबाबदार असल्याने संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मनसेची मागणी असल्याचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी येथे सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे शहर अध्यक्ष संतोष कुडाळकर, बिडवाडी विभागीय अध्यक्ष अनंत आचरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी राजन दाभोलकर म्हणाले, सिंधुदुर्गातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना ठेकेदार तसेच संबंधित खातेप्रमुख जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आठ दिवसांपूर्वी मनसेतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करून त्याच्या प्रति जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याची दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आवश्यक होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनसेतर्फे मानवी हक्क आयोगाकडे दाद मागण्यात येणार आहे. तसेच सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका ठेकेदारांतर्फे बनविलेल्या रस्त्यांवर खड्डे पडून अपघात होत असल्यामुळे संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय रस्त्यांची कामे सुधारणार नाहीत.
त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून असलेल्या अधिकारांचा वापर करून सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
युतीचे पालकमंत्री,आमदार तसेच खासदार हे रेल्वे तसेच विमानाने फिरू लागल्याने त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. हे नेते स्वत:च्या वाढदिवसावर लाखो रुपये उधळतात, तर मग जनतेसाठी स्वत:च्या खिशातून खर्च करून रस्त्यावरील खड्डे का बुजवित नाहीत? पूर्वी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार होतो, असे युतीचे नेते ओरडत होते. मग आता ते सत्तेत असताना नेमके काय चालले आहे? पालकमंत्री आता गप्प का आहेत?असा प्रश्नही दाभोलकर यांनी यावेळी उपस्थित केला.(वार्ताहर)
पवारांच्या कुटुंबीयांची जबाबदारी घ्या !
बिबवणे येथील महिलेच्या तसेच उत्तम पवार यांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी. खासदार व पालकमंत्र्यांनी पवार यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च करावा. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारुन आर्थिक मदत द्यावी, असेही राजन दाभोलकर यावेळी म्हणाले.
जिल्हा प्रशासनाची दडपशाही !
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जनतेचा आवाज दडपून टाकण्यासाठी गेले वर्षभर मनाई आदेश जारी केल्याने आम्हाला कोणतेही आंदोलन करता येत नाही, अशी खंतही दाभोलकर यांनी यावेळी व्यक्त केली.