पैसे घेताना दोघा पोलिसांचे चित्रीकरण
By admin | Published: April 5, 2015 12:53 AM2015-04-05T00:53:26+5:302015-04-05T00:53:26+5:30
निलंबनाची कारवाई होणार
सावंतवाडी : विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फणसगांव चेकनाक्यावर एका व्यक्तीने दोन पोलिसांचे पैसे घेताना व्हिडीओ चित्रीकरण केले. हे चित्रीकरण पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांना पाठवून दिले. या प्रकरणी अधीक्षकांनी केलेल्या चौकशीत दोन पोलीस कर्मचारी दोषी आढळले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फणसगांव चेकनाक्यावर दोन पोलीस कर्मचारी तैनात होते. हे पोलीस कर्मचारी गाडी थांबवून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडे कागदपत्रांच्या चौकशीच्या नावाखाली पैशांची मागणी करत असत. याबाबत एका व्यक्तीने या पोलीस कर्मचाऱ्यांचे पैसे घेताना व्हिडीओ चित्रीकरण केले. हे चित्रीकरण जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांना पाठविले. त्यांनी या प्रकरणाची दखल घेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यांनी गेले दोन दिवस या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपला अहवाल शुक्रवार ३ एप्रिलला पोलीस अधीक्षकांना सादर केला. त्यानंतर शनिवारी अधिक्षकांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना ओरोस येथील अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांची पुन्हा चौकशी केली. चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे दोन्ही कर्मचारी प्रथमदर्शनी दोषी आढळत आहेत. त्यामुळे अधिक्षकांनी त्या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्याचे ठरविले आहे. मात्र रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सोमवारी याबाबत आदेश निघणार आहेत.
गेले काही दिवस सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येक चेकपोस्टवर तसेच वाहतूक पोलीस कागदपत्रांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करीत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र पर्यटकांनी याबाबतचे चित्रीकरण करून ते अधिक्षकांना पाठविल्याने आतातरी पोलीस यावर कडक भूमिका घेतील. (प्रतिनिधी)
अद्यापपर्यंत मला माहिती नाही : विजय खरात
या घटनेबाबत मला माहिती नाही. मी आज दिवसभर देवगडला होतो. मी पूर्ण माहिती घेतो. तुमच्याकडे काही माहिती असेल तर मला सांगा, असे सांगत पोलीस उपअधीक्षक विजय खरात यांनी या घटनेबाबत माहित नसल्याचे सांगितले.