‘सी-वर्ल्ड’चा अंतिम आराखडा लवकरच

By admin | Published: November 30, 2015 09:32 PM2015-11-30T21:32:20+5:302015-12-01T00:19:48+5:30

काळसेकर : ग्रामस्थ, स्थानिक आमदारही अनुकूल

The final plan for 'SeaWorld' will be soon | ‘सी-वर्ल्ड’चा अंतिम आराखडा लवकरच

‘सी-वर्ल्ड’चा अंतिम आराखडा लवकरच

Next

मालवण : भारतातील एकमेव अशा तोंडवळी-वायंगणी येथे प्रस्तावित जागतिक दर्जाच्या ‘ओशियानिक वर्ल्ड’ (सीवर्ल्ड) प्रकल्पाचा मार्ग सुकर बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर नुकतीच तोंडवळी-वायंगणी ग्रामस्थ आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांची मंत्रालयात बैठक पार पडली. यात जागामालक आणि आमदारांनी सकारात्मक भूमिका घेत प्रकल्पास अनुकूलता दर्शविली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३५० ते ४०० एकर या कमी जागेचा अंतिम आराखडा लवकरच पूर्ण
होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली आहे.
तालुक्यातील तोंडवळी-वायंगणी येथील हा मोठा पर्यटन प्रकल्प अनेक वर्षे विरोध आणि राजकारण याच्या ग्रहणात सापडला आहे. प्रकल्पाबाबत अनुकूलता व आराखडा निश्चिती या काळसेकर यांच्या विधानाने प्रकल्पाचा मार्ग अधिक सुकर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. १३७५ एकर जागेत यापूर्वी प्रस्तावित असलेला हा प्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधानंतर भाजप सरकारने कमी जागेत आणला.
सिंधू महोत्सवानिमित्ताने वर्षभरापूर्वी मालवणात आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प ओशियानिक वर्ल्ड असेल व तो ३५० ते ४०० एकरमध्ये साकारला जाईल असे स्पष्ट केल्यानंतर प्रकल्पाच्या नव्या आणि अंतिम आराखड्याच्या हालचालींना भाजप सरकारने गती दिली आहे.

सी वर्ल्ड कमी जागेत होण्यासाठी भाजप प्रयत्नशील
काळसेकर म्हणाले, पर्यटन राज्यमंत्री यांच्यासोबत आराखड्याच्या निश्चितीबाबत बैठका सुरू आहेत. लवकरच अंतिम आराखडा जाहीर होईल.
कमी जागेतील या जागतिक दर्जाच्या प्रकल्पासाठी विरोध करणारी काही ग्रामस्थ मंडळी सहमत झाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई येथे काही जागामालकांची बैठकही पार पडली. त्यातही जागा देण्याबाबत जागा मालकांनी सहमती दर्शवली आहे.
शिवसेना आमदार नाईकही प्रकल्पाबाबत अनुकूल झाले आहेत, असे काळसेकर यांनी स्पष्ट केले. सी-वर्ल्ड तोंडवळी-वायंगणी येथेच कमी जागेत होण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, असा विश्वास काळसेकर यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The final plan for 'SeaWorld' will be soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.