अंत्यसंस्काराला अखेर ‘शेड’ची सावली
By admin | Published: April 19, 2015 10:07 PM2015-04-19T22:07:59+5:302015-04-20T00:13:32+5:30
नियोजन मंडळाची मंजुरी : जिल्ह्यात २८८८ स्मशानशेडच्या कामांना मंजुरी
रत्नागिरी : मरणानंतर तरी शांत चित्ताने ग्रामस्थाने जगाचा निरोप घ्यावा त्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करुन जिल्ह्यात २८८८ स्मशान शेड उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजुरीही देण्यात आली आहे.
जन्मापासून ते मरणापर्यंत जनतेला सोयीसुविधा देण्याचे धोरण शासनाने आखले आहे. मुलांचा जन्म होण्याआधीच गरोदर महिलांना योग्य आहार, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी शासनाकडून घेण्यात येत आहे. त्यानंतर शिक्षणापासून आता अन्न धान्याची सोय तर केली आहेच. शिवाय मोफत औषधोपचार करण्यासाठी जीवनदायी योजना सुरु केली. त्यातून हजारो लोकांना मरणातून वाचवण्यासाठी कॅन्सर, हृदय विकारावरही उपचार करण्यात येत आहेत. विकासाबरोबरच जनतेला सर्वच सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे धोरण शासनाकडून राबविले जात आहे.
शासनाचे विकासासाचे धोरण माणसाच्या अंतिम यात्रेपर्यंत म्हणजेच स्मशानभूमीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून जनसुविधा अंतर्गत स्मशान शेड उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाभरातून प्रस्ताव मागविण्यात आले होते.
जिल्ह्याच्या सर्वच ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आपल्या हद्दीतील स्मशानभूमींसाठी अवश्यक असलेली स्मशानशेडचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे पाठविण्यात आले होते. ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील २८८८ स्मशानशेडचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर तो प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवण्यात आला होता.
जनसुविधाअंतर्गत स्मशान शेड बांधकामासाठी १ लाख ९२ हजार रुपये देण्यात येत होते. वाढत्या महागाईसह शासनानेही विचार करुन त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता २ लाख ५२ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. त्यामुळे या स्मशान शेडची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे.
गेले अनेक दिवस काही स्मशानांमध्ये शेड नसल्याची ओरड जिल्हाभरात सुरू होती. मात्र, आता हा प्रश्नही अगदी लवकरच मार्गी लागणार आहे. (शहर वार्ताहर)
तालुका मंजूर स्मशानशेड
मंडणगड१८५
दापोली२९६
खेड१५२
चिपळूण७२२
गुहागर२६३
संगमेश्वर५३१
रत्नागिरी३१८
लांजा३७८
राजापूर ४३
एकूण२८८८