अखेर धनगर वस्तीवर पाणी...

By Admin | Published: November 18, 2015 11:28 PM2015-11-18T23:28:02+5:302015-11-19T00:45:27+5:30

सडुरे तांडळघाटी : अनेक वर्षांपासून होणारी पायपीट थांबली

Finally water on Dhangar ... | अखेर धनगर वस्तीवर पाणी...

अखेर धनगर वस्तीवर पाणी...

googlenewsNext

 वैभववाडी : सडुरे तांडळघाटी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रलंबित प्रश्न अखेर सुटला आहे. पिण्याचे पाणी वस्तीनजीक पोहोचल्यामुळे तेथील धनगर समाजाचा वनवास संपला असून, कित्येक वर्षांची पाण्यासाठी होणारी पायपीट आता थांबली आहे. त्यामुळे येथील रहिवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
सडुरे तांडळघाटी ही संपूर्ण धनगर समाजाची वस्ती असून, तेथील लोकसंख्या सुमारे पावणेदोनशे आहे. तेथील जनतेला पिण्याचे पाणी आणि रस्त्याच्या समस्येने ग्रासलेले होते. सूक नदीच्या पलीकडे जंगलमय भागातील या वस्तीपर्यंत माजी आमदार प्रमोद जठार यांच्या आमदार निधीतून प्रमोद रावराणेंनी कच्चा रस्ता नेला. रस्त्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
राष्ट्रीय पेयजल योजनेतून जिल्हा परिषदेमार्फत नदीकाठी विहीर खोदण्यात आली. मात्र, वस्तीपासून ती दीड दोन किलोमीटरवर असल्याने चढणीच्या पायवाटेने पाणी घेऊन जावे लागत होते. त्यामुळे चांगलीच दमछाक होत होती. पिण्याचे पाणी वस्तीपर्यंत पोहोचावे म्हणून ग्रामपंचायत सदस्य विजय बोडेकर यांनी वाडीतील लोकांना घेऊन अनेकदा उपोषणे, आंदोलने केली. अखेर गेल्या एप्रिलमध्ये केलेले उपोषण फळाला आले. भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी तांडळघाटीवासीयांचे उपोषण सोडविताना दिलेल्या आश्वासनानुसार नळयोजनेसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे टंचाई आराखड्यातून नदीकाठच्या विहिरीवरून पाईपलाईन टाकून तांडळघाटीच्या धनगर वस्तीपर्यंत पाणी नेण्याचे शिवधनुष्य ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पेलवले.
नदीकाठच्या विहिरीपासून दुर्गम भागातून सुमारे दीड किलोमीटर पाईपलाईन टाकून पाणी वस्तीपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. या नळपाणी पुरवठ्याचा प्रारंभ सडुरेचे माजी सरपंच विजय रावराणे यांच्या हस्ते झाला.
यावेळी सरपंच सत्यवान डांगे, ग्राम पाणीपुरवठा समिती अध्यक्ष रमेश सुतार, डी. के. सुतार, संतोष बोडके, विजय बोडेकर, बिरु बोडेकर, रामचंद्र बोडेकर, गंगाराम बोडेकर, बापू बोडेकर, रवींद्र बोडेकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Finally water on Dhangar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.