ओसरगावात लाकडाच्या डेपोला आग, लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 03:06 PM2020-03-12T15:06:31+5:302020-03-12T15:08:01+5:30
महामार्गालगत ओसरगाव येथे असलेल्या महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या लाकडाच्या डेपोला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
कणकवली : महामार्गालगत ओसरगाव येथे असलेल्या महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या लाकडाच्या डेपोला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
सध्या कणकवली तसेच कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या चौपदरीकरण कामादरम्यान महामार्गाच्या दुतर्फा असलेली आंबा, साग अशी विविध प्रकारची झाडे तोडण्यात आली आहेत. त्या झाडांचे ओंडके दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीने एकत्र करून ओसरगाव येथे महामार्गालगत रचून ठेवले होते. या लाकडांच्या डेपोला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की सुमारे तीन एकर परिसरात रचून ठेवलेले लाकडाचे ओंडके जळून खाक झाले आहेत.
मंगळवारी दिलीप बिल्डकॉनच्या काही कामगारांची सुटी होती. त्यामुळे थोडेच कामगार उपस्थित होते. या आगीची माहिती समजताच कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला यश आले नाही. कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबालाही पाचारण करण्यात आले. त्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
मात्र, मोठ्या प्रमाणात लाकडाचे ओंडके जळून खाक झाले आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, त्याबाबतचा नेमका आकडा समजू शकला नाही. या घटनेबाबत दिलीप बिल्डकॉनचे कार्यकारी अधिकारी लवकुश मुन्नीलाल विश्वकर्मा (२६, सध्या रा. ओसरगाव) याने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. मात्र, या घटनेप्रकरणी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
यापूर्वीही लागली होती आग
यापूर्वीही ओसरगाव येथील दिलीप बिल्डकॉनच्या बेस कॅम्पमध्ये आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळच्या आठवणी या घटनेमुळे जाग्या झाल्या. मंगळवारी लागलेल्या आगीमुळे वीज वितरणचेही नुकसान झाले आहे.