भिरवंडेत घराला आग; साडेचार लाखांचे नुकसान
By admin | Published: February 27, 2017 11:23 PM2017-02-27T23:23:53+5:302017-02-27T23:23:53+5:30
भिरवंडेत घराला आग; साडेचार लाखांचे नुकसान
कणकवली : तालुक्यातील भिरवंडे येथील वरची परतकामवाडीतील घराला आग लागून, सुमारे चार लाख ६५ हजार ७०५ रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागली त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यामुळे मोठी हानी टळली. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
भिरवंडे वरची परतकामवाडी येथे रवींद्र तुकाराम सावंत यांचे घर आहे. ते तालुक्यातील सावडाव हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे कणकवली येथे ते राहतात. त्यांच्या भिरवंडे येथील घरात रायमन जॉन लोबो हे पत्नी एल्विन, मुलगा न्याल्विन यांच्यासह भाड्याने राहतात. सोमवारी रायमन लोबो कुटुंबीयांसह कुंभवडे येथे पाहुण्यांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते.
सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घराजवळील रस्त्यावरून एक दुचाकीस्वार जात होता. त्याला घरातून धूर येताना दिसला. त्याने याबाबत सावंत यांच्या शेजाऱ्यांना कल्पना दिली. यावेळी भिरवंडे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र सावंत, अमित सावंत, आद्राव डिसोझा, एरोन डिसोझा, सुधाकर सावंत, दत्ताराम खांबल, आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घराला आग लागल्याचे समजताच ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
घराशेजारील विहिरीतील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, सोमवारी वीज प्रवाह बंद असल्याने वीजेवरील पाण्याचे पंप सुरू करता आले नाहीत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास वेळ लागल्याने अधिक हानी झाली. आगीबाबत रवींद्र सावंत, तसेच रायमन लोबो यांना कल्पना देण्यात आली. माहिती समजताच त्यांना धक्काच बसला. ते घराजवळ तत्काळ दाखल झाले.
या आगीत रवींद्र सावंत यांच्या चिरेबंदी घराचे लाकडी छप्पर, दरवाजे, खिडक्या, फर्निचर, आदी लाकडी सामान तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे त्यांचे दोन लाख ७७ हजार १५० रुपयांचे
नुकसान झाले, तर घरातील भाडोत्री
रायमन लोबो यांच्या सोन्याच्या चार बांगड्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्याचा हार, दोन अंगठ्या असे दागिने, कपडे, धान्य, भांडी, तोळ्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्याचा हार, दोन अंगठ्या असे दागिने, कपडे, धान्य, भांडी, शैक्षणिक साहित्य व रोख २० हजार रुपये आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. त्यामुळे लोबो यांचे एक लाख ८८ हजार ५५५ रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती समजताच उपसरपंच मिलिंद सावंत, मंडळ अधिकारी शरद कुलकर्णी, तलाठी अर्जुन पंडित, ग्रामसेवक राकेश गोवळकर, कोतवाल अरविंद सावंत, पोलिसपाटील बाळकृष्ण सावंत यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून पंच यादी घातली.(प्रतिनिधी)