कुडाळातील काथ्या प्रकल्प युनिटला आग, सुमारे २५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:20 PM2020-03-16T12:20:43+5:302020-03-16T12:22:15+5:30
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील महाराष्ट्र लघुविकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या काथ्या उद्योग कंपनीतील प्रकल्प युनिटला शनिवारी दुपारी भीषण आग ...
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील महाराष्ट्र लघुविकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या काथ्या उद्योग कंपनीतील प्रकल्प युनिटला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत काथ्या व मशिनरी जळून सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
कामगारांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्यामुळे जीवितहानी टळली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र लघुविकास महामंडळातर्फे कुडाळ एमआयडीसी येथे तीन वर्षांपूर्वी काथ्या निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. या कंपनीत नारळाच्या सोडणापासून काथ्या तसेच काथ्यापासून विविध वस्तू तयार केले जातात. तसेच जिल्ह्यातील बचतगट, नवउद्योजकांना प्रशिक्षण दिले जाते.
शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कंपनीतील काथ्या प्रक्रिया विभागात काथ्या तयार करण्याचे काम काही कर्मचारी करीत होते. यावेळी अचानक तेथील काथ्यामधून धूर येऊ लागला व काही क्षणात आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या काथ्याने पेट घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
या आगीत काथ्या तयार करणारी मशीन, कन्व्हेअर, ३० फुटी बेल्ट व इलेक्ट्रॉनिक मोटर, १० ते १२ टन कोकोपीट, १४ टन काथ्या, सुंभ दोरी, ठिबक सिंचन पाईप लाईन, इलेक्ट्रॉनिक पॅनल स्वीच तसेच इतर साहित्य मिळून सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग अनेक तास धुमसत असल्याने अग्निशमन दलाला वारंवार गाडीमध्ये पाणी भरावे लागले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी उशिरा आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली.
काथ्या प्रकल्प युनिटला लागलेली आग काही वेळातच कंपनीनजीकच्या जमिनीत असलेल्या धोंड यांच्या काजूच्या बागेत पसरली त्यामुळे काजू कलमे व बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशी माहिती धोंड यांनी दिली.
अग्निशमन उपाययोजनांकडे दुर्लक्ष
ही काथ्या प्रकल्प कंपनी शासकीय असून कंपनीत सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून आले. प्रत्येक कंपनी, कारखान्यात अग्निशामक यंत्रणा असणे बंधनकारक आहे. असे असूनही याकडे दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. काथ्या सुकलेल्या अवस्थेत असल्याने अशा घटना केव्हाही घडू शकतात. मात्र, या ठिकाणी तशी कोणतीच दक्षता घेतलेली दिसून येत नाही.
आग लागली की लावली?
काथ्या तयार करणारी मशीन सुरू असताना त्याच्या इलेक्ट्रॉनिक मोटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती तेथील एका कामगाराने दिली. दरम्यान, ही आग लागली की लावण्यात आली, अशी शंका येथील काही ग्रामस्थ आणि उद्योजकांतून उपस्थित करण्यात आला.