पडवणे येथील आगीत ४०० कलमे होरपळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 05:02 PM2020-12-04T17:02:32+5:302020-12-04T17:04:14+5:30
Fire, Mango, sindhudurg पडवणे माळरानावर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अग्नितांडवाने रौद्र रूप धारण केल्याने ७० हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात सुमारे ४०० कलमे होरपळून शेतमांगरालाही आगीची झळ पोहोचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
देवगड : पडवणे माळरानावर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अग्नितांडवाने रौद्र रूप धारण केल्याने ७० हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात सुमारे ४०० कलमे होरपळून शेतमांगरालाही आगीची झळ पोहोचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
पडवणे येथील माळरानावर ३० नोव्हेंबर रोजी गवताला अचानक आग लागली होती. या आगीचा वाऱ्यामुळे भडका उडून आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या झळीने सुमारे ७० हेक्टर क्षेत्र व्यापले गेल्याने आग आटोक्यात आणणे कठीण बनले होते.
पडवणे येथील सुमारे २०० ते २५० ग्रामस्थांनी बुधवारी सकाळपासून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वाऱ्यामुळे व गवतामुळे आग नियंत्रणामध्ये येणे ग्रामस्थांना कठीण होऊन बसले होते. दिवसभर आग नियंत्रणात आणण्यास पडवणे ग्रामस्थ प्रयत्न करीत होते.
अखेर ते यशस्वी झाले. मात्र, या अग्नीतांडवामध्ये बागायतदारांची सुमारे ४०० हून अधिक कलमे आगीत होरपळली. तर प्रमोद रेवंडेकर यांच्या शेतमांगरालाही आगीची झळ बसली. आठ दिवसापूर्वी सौंदाळे बाऊळवाडी येथेही राणे यांच्या कलमबागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.