फटाके वाजवणे,नरकासुर प्रतिमा दहन यावर नियंत्रण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 10:49 AM2020-11-13T10:49:01+5:302020-11-13T10:52:16+5:30
coronavirus, diwali, crackersban, sindhudurg सध्या कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजविणे तसेच नरकासुर प्रतिमा दहन करणे अशा विविध माध्यमातून वायूप्रदूषण होणार नाही, याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समूह संसर्ग वाढू नये यासाठी गर्दीही टाळणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढू शकतो.
सुधीर राणे
कणकवली : सध्या कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजविणे तसेच नरकासुर प्रतिमा दहन करणे अशा विविध माध्यमातून वायूप्रदूषण होणार नाही, याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समूह संसर्ग वाढू नये यासाठी गर्दीही टाळणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढू शकतो.
शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये कोविड -१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या जगभरातील एकूण रुग्णांपैकी १५ टक्के रुग्ण वायूप्रदूषणाच्या संसर्गामुळे मृत्यू पावल्याचे समोर आले आहे. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायूप्रदूषणाचा परिणाम लक्षात घेऊन सणांच्या कालावधीत फटाके फोडण्यावर शासनाकडून काही प्रतिबंध घालण्यात आले आहेत . त्याचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर नरकासुर प्रतिमांच्या दहनामुळेही वायुप्रदूषण होते. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिमा कोरडा गवताचा पेंडा , कागद , पुठ्ठा ,लाकूड , प्लास्टिक आदी वस्तूंपासून बनवलेल्या असतात . त्या जाळल्याने कार्बन मोनोक्साईड , हायड्रोकार्बन यांची निर्मिती होते.
त्यामुळे वायूप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते . याचा मनुष्याच्या आरोग्यावर गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो . कोरोना महामारी पसरलेली असतांनाही नरकासुराच्या प्रतिमा बनवून त्या जाळणे व फटाके फोडणे याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांच्यावेळी उत्साहाच्याभरात होणारी गर्दीही धोकादायक ठरू शकते.
सध्या थँडीचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी धुके पडते आणि तापमान अल्प होते . त्यामुळे हवेतील प्रदूषित घटक भूमीजवळ खेचले जातात . हे विषारी घटक आपल्या श्वासोच्छ्वासाच्या संपर्कात येतात . हे प्रदूषित घटक श्वसनक्रियेच्या माध्यमातून आपल्या शरिरात जातात आणि आपल्याला अपायकारक ठरतात . कोरोना महामारीपासून रक्षण करण्यासाठी सध्या आपल्याला शुद्ध हवेची नितांत आवश्यकता आहे . अशा धोकादायक परिस्थितीत नरकासुर प्रतिमादहनासारखे कार्यक्रम करणे घातक ठरू शकते. असे वैद्यकीय तज्ञाचे म्हणणे आहे. त्याचा सजग नागरिकांनी विचार करणे आवश्यक आहे.
प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी !
कोरोनाच्या कालावधीत वायूप्रदूषण वाढू नये यासाठी स्वयंशिस्तीचे पालन आवश्यक आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत. कोरोनाच्या कालावधीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून स्वतः बरोबरच इतरांच्याही आरोग्याची काळजीही प्रत्येकाने घ्यावी. दमा तसेच इतर श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना वायूप्रदूषणामुळे आणखीनच त्रास
होऊ शकतो.
- डॉ.कुबेर मिठारी .
तालुका आरोग्य अधिकारी, मालवण.