सावंतवाडी बाजारपेठेत फटाक्यांची दुकाने सजली

By Admin | Published: September 6, 2015 08:45 PM2015-09-06T20:45:21+5:302015-09-06T20:45:21+5:30

उलाढाल वाढली : लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध

Fireworks shops in the Sawantwadi market have been decorated | सावंतवाडी बाजारपेठेत फटाक्यांची दुकाने सजली

सावंतवाडी बाजारपेठेत फटाक्यांची दुकाने सजली

googlenewsNext

प्रसन्न राणे - सावंतवाडी  गणरायाच्या आगमनाची चाहुल लागताच गणेशाच्या स्वागतापासून ते विसर्जनापर्यंत अत्यावश्यक असलेल्या फटाक्यांची उलाढाल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उत्सव कालावधीत घराघरात फटाक्यांची आतषबाजी सुरू असते. या पार्श्वभूमीवरच सावंतवाडी बाजारपेठेतील फटाक्यांची दुकाने सजली आहेत.
समस्त कोकणवसीयांच्या जिव्हाळ्याचा सण गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान मुलांच्यात आतापासूनच गणेश संचारला आहे. तर घरातील सर्वांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. त्याच्या स्वागतासाठी घरे, शहरे सज्ज झाली आहेत. गणेश सजावटीच्या विविध साहित्याने बाजार पेठेतील दुकाने सजली आहेत. गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अत्यावश्यक मानले जाणारे फटाकेही तितकेच लोकप्रिय मानले जातात. त्यामुळे फटाक्यांची दुकानेही गजबजू लागली आहेत. गणेशोत्सवाची सर्व खरेदी झाल्यानंतर शेवटची खरेदी म्हणजे फटाके खरेदी करण्याची असते. फटाक्यांचा गतवर्षीचाच दर यावर्षीही कायम असल्याने फटाक्यांच्या खरेदीतही वाढ होताना दिसत आहे.
लहान मुलांना घातक असणाऱ्या फटाक्यांवर प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे घातक फटाक्यांची विक्री कमी प्रमाणात होत आहे. तर यामध्ये रंगीबेरंगी फुलबाज्या, बंदुका, सुतळीबॉम्ब, जमीनचक्र, किटकॅट, आतषबाजी, फॅन्सी अ‍ॅटम, नागगोळी, हवेत उडणारे फुगे, बटरफ्लाय अशा विविध फटाक्यांची सध्या मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, लहान मुलेही फटाक्यांकडे आकर्षित होत आहेत.
गणेशोत्सवाच्या कालावधीत फटाक्यांची आतषबाजी ही नित्याचीच. आता फटाक्यांमध्येही वेगवेगळे प्रकार मिळत असल्याने युवक आणि लहानग्यांचा फटाके खरेदीकडेच जास्त कल आहे. फटाक्यांच्या दुकानांचे बच्चे कंपनीला आकर्षण असते. सार्वजनिक गणेशोत्सवातही फटाक्यांची आतषबाजी केली जाते.
फटाक्यांमधील बच्चे कंपनीचा सर्वात आवडता प्रकार ‘आपटबार’ शासनाने आता वगळला आहे. स्थानिक पातळीवरच आपटबारांचे उत्पादन होते. परंतु या प्रकारातील घटकांचा वापर बॉम्ब बनविण्यासाठी होत असल्याने सरकारने ‘आपटबार’ या प्रकारावर बंदी घातली आहे, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षीच्याही चतुर्थीत आपटबारांचे छोटे स्फोट ऐकायला मिळणार नाहीत. सध्या डॉल्बी सिस्टिमवर काही प्रमाणात बंदी असल्याने गणेशभक्त विसर्जनावेळी फटाक्यांच्या आतषबाजीकडेच वळू लागले आहेत. त्यामुळे यंदा फटाक्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. सावंतवाडी शहरात अनंत चतुर्दशीच्या सार्वजनिक गणेश विसर्जनावेळी सावंतवाडी शहरात स्थानिक मंडळांमध्ये फटक्यांच्या आतषबाजीची स्पर्धा सुरू असते. यावेळी लाखो रूपयांच्या फटाक्यांची आतषबाजी सर्वांकडून केली जाते. सर्वांनाच फटाक्यांचे आकर्षण असते. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीबरोबरच ढोलताशांच्या गजरात गणरायांना निरोप दिला जातो.

गेली कित्येक वर्षे शिवकाशी येथील उच्च दर्जाचे फटाके जिल्हाभरात पुरविले जात आहेत. दरवर्षी नवनवीन फटाके व लहान मुलांना आकर्षित असे फटाके भक्तांसाठी आणले जात आहेत. फटाक्यांना लहानांसह युवकांची मोठी मागणी आहेच पण जेष्ठांनाही हे फटाके आता आकर्षित करत आहेत. शिवाय दरही नियंत्रणात असल्याने फटाक्यांच्या विक्रीला आतापासूनच सुरूवात झाली आहे.
- एस. एस. डुबळे, व्यापारी, सावंतवाडी

Web Title: Fireworks shops in the Sawantwadi market have been decorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.