उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार करून पसार, संशयित तिघांना आंबोलीत पकडले; राजापुरातील घटना
By अनंत खं.जाधव | Published: September 6, 2023 01:20 PM2023-09-06T13:20:50+5:302023-09-06T13:21:12+5:30
आंबोली : दारू वाहतूकीचा पाठलाग करणार्या राजापुर येथील उत्पादन शुल्कच्या पोलिस अधिकार्यांच्या गाडीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना आंबोली ...
आंबोली : दारू वाहतूकीचा पाठलाग करणार्या राजापुर येथील उत्पादन शुल्कच्या पोलिस अधिकार्यांच्या गाडीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना आंबोली येथे ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोघे सोलापूर जिल्ह्य़ातील तर एकजण राजस्थान येथील आहे. हा प्रकार काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास राजापुर येथे घडला. संशयित तिघांना आज, बुधवारी पहाटे शिताफीने कोल्हापुरच्या दिशेने पलायन करताना आंबोली येथे पकडण्यात आले.
संशयित आरोपीत प्रविण परमेश्वर पवार (२५, रा. तांबाळे, ता. मोहोळ), शेखर नेताजी भोसले (२५, रा. खवणे, ता. मोहोळ), प्रेमकुमार जेटाराम चौधरी (२३, रा.गुडामलानी- बाडनेर राजस्थान) याचा समावेश आहे.
राजापूर येथून दारू वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला होता. यावेळी हे तीन युवक दारु वाहतूक करीत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकारी पाठलाग करत असल्याचे संशयित आरोपीच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांवर फायरिंग केले. अन् सिंधुदुर्गच्या दिशेने पळ काढला.
संशयितांना पकडण्यासाठी सावंतवाडी पोलिसांनी आंबोली येथे सापळा रचला. यामध्ये पहाटेच्या सुमारास या तिघांना पकडण्यास यश आले. ही कारवाई आंबोली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर, हवालदार दीपक शिंदे, मनिष शिंदे, महेंद्र मातोंडकर, चंद्रकांत जंगले आदी पोलिस कर्मचार्यांनी केली. याप्रकरणी राजापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्या तिघांना राजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.