सिंधुदुर्गातील आचऱ्यात गोळीबार, एक युवक जखमी; हल्लेखोरांना ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 05:02 PM2023-05-05T17:02:06+5:302023-05-05T17:02:36+5:30
बेछूट गोळीबार आणि युवकावर झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्याने आचरे गाव हादरला
आचरा : बेछूट गोळीबार आणि युवकावर झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्याने आचरे गाव हादरला. हल्ला करणाऱ्या तिघा हल्लेखोरांना स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सुरुवातीला आचरा तिठा येथे हल्लेखोर आणि आचरा पारवाडी, डोंगरेवाडी येथील युवकांची बाचाबाची झाली. त्यानंतर काही वेळातच हल्लेखोरांनी पारवाडी येथील युवकांची चारचाकी रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आडवी घालत अडविण्याचा प्रयत्न करत चारवेळा गोळीबार केला. यावेळी गाडीत बसलेल्या गौरव पेडणेकर (पारवाडी) या युवकावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गौरव याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
दरम्यान, गोळीबार व चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर आचऱ्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे दाखल झाले. आचरा आरोग्य केंद्राबाहेर झालेली गर्दी पोलिसांनी पांगवली. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांविरोधात तक्रार देण्याची कार्यवाही सुरू होती. तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघा हल्लेखोरांची जबानी पोलिस घेत होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आचरा येथे बंधाऱ्याच्या कामाला अटकाव करणाऱ्याची सुपारी घेतल्याच्या संशयावरून तौकिर जुम्मन शेख (रा. आचरा) याच्याशी आचरा डोंगरेवाडी पारवाडीतील युवकांमध्ये आचरा तिठ्यावर वाद झाला. त्यानंतर संशयित तौकिर हा निघून गेला. काही वेळानंतर आणखी सहकारी घेऊन येत बाचाबाची करणाऱ्या युवकांच्या चारचाकीसमोर दुचाकी आडवी घालून जाब विचारत गोळीबार केला.
याचदरम्यान चारचाकीमधील गौरव पेडणेकर या युवकाच्या डाव्या हातावर चाकू हल्ला करत दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळून जात असताना त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी तिथेच टाकून पळून जात असताना प्रत्यक्षदर्शिनी त्यांचा पाठलाग करत दोघांना पकडले.
प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा शुभम जुवाटकर (रा. दांडी मालवण) व दुचाकी चालवणारा प्रतिक हडकर (रा. चिंदर सडेवाडी) यांना जमावाने प्रसाद देत पोलिस येईपर्यंत पकडून ठेवले.
घटनास्थळी चार पुंगळ्या आढळून आल्या होत्या. जमावाबरोबर झालेल्या झटापटीत जुवाटकर याच्याकडील रिव्हॉल्व्हर व चाकू रस्त्यावर पडलेले होते. तसेच घटनास्थळी पाकीट व चिलीम पडलेली होती. पोलिस निरीक्षक शंकर कोरे, अक्षय धेंडे, मनोज पुजारे, बाळू कांबळे हे घटनास्थळी दाखल होत संशयितांना ताब्यात घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मास्टरमाईंडला गजाआड करा
हल्लेखोर हे चरस गांजाच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. पोलिसांनी हल्ल्याचा तपास करण्याबरोबर चरस गांजाचे रॅकेट चालवणाऱ्या या टोळीच्या मुळाशी जाऊन चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या गोळीबारप्रकरणी आणखी कोणाचा हात असेल, त्यालाही पोलिसांनी गजाआड करावे, अशी मागणी उपस्थित धोंडी चिंदरकर, जेरोन फर्नांडिस, राजन गावकर, महेश राणे, बाबू कदम, अभिजित सावंत, मंदार सरजोशी, प्रशांत गावकर यासह ग्रामस्थांनी केली.