तंत्रशिक्षण प्रशिक्षणासाठी पहिली तुकडी डहाणूला रवाना
By Admin | Published: May 12, 2016 10:30 PM2016-05-12T22:30:06+5:302016-05-13T00:14:35+5:30
तंत्रशिक्षणाला नवी चालना : सावंतवाडीतील भोसले संस्थेचा रिलायन्स संस्थेशी करार
सावंतवाडी : विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आज तंत्रशिक्षण काळाची गरज बनले आहे. तंत्रशिक्षणाच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष काम करण्याची पद्धती अवगत झाली तर सखोल ज्ञान मिळतेच; पण त्याचबरोबर या क्षेत्रातील नोकरीसाठीही ते महत्त्वाचे असते. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक संस्थेने याच गरजेतून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार भोसले पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल शाखांमधील विद्यार्थ्यांची तुकडी सात दिवसांच्या प्रशिक्षणासाठी डहाणूला रवाना झाली. जिल्ह्यातील अशा प्रकारचा पहिल्याच करारामुळे तंत्रशिक्षणातील मुलांना कंपनीच्या विविध विभागांमध्ये चालणारे कामकाज जवळून अनुभवता येणार असून, समूह मुलाखती, कंपनीचे वैयक्तिक पातळीवरील प्रशिक्षण, कंपनीचे प्रमाणपत्र आदींसह या क्षेत्रातील नोकरीच्या संधीही मिळण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे हा करार म्हणजे सावंतवाडीच्या तंत्रशिक्षणाला नवी दिशा मानला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक (सावंतवाडी) व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यानुसार रिलायन्सअंतर्गत कार्यरत असणाऱ्या डहाणू थर्मल पॉवर स्टेशन, डहाणू (जि. पालघर) येथील कंपनीमार्फत भोसले पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल शाखांमधील विद्यार्थ्यांना कंपनीच्या प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी प्रशिक्षण मिळणार आहे. कंपनीचा ५०० मेगावॅट क्षमतेचा विद्युतनिर्मिती प्रकल्प १९९५ पासून
कार्यरत आहे. रिलायन्स व भोसले पॉलिटेक्निकमधील करारामध्ये भविष्यात विद्यार्थ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र, विद्यावेतन सुविधा
तसेच कॅम्पस मुलाखतीद्वारे
कंपनीमध्ये नोकरीची संधी, आदी गोष्टी समाविष्ट आहेत. रिलायन्ससारख्या कंपनीबरोबर हा करार झाल्याने विद्यार्थ्यांना देशातील मोठ्या आस्थापनामध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
या करारानुसार भोसले पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल शाखांमधील विद्यार्थ्यांची एक तुकडी विभागप्रमुख प्रा. डी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसांच्या प्रशिक्षणासाठी डहाणूला रवाना झाली. (वार्ताहर)