देवगड हापूसच्या पहिल्या पेट्या वाशी मार्केटला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 06:59 PM2021-12-20T18:59:29+5:302021-12-20T19:03:08+5:30
देवगड तालुक्यामधून देवगड हापूसच्या यावर्षीच्या पहिल्या पेट्या पाठवण्याचा मान अरविंद वाळके यांना मिळाला आहे.
देवगड : तालुक्यातील कुणकेश्वर वाळकेवाडी येथील आंबा बागायतदार अरविंद वाळके यांच्या पाच डझनच्या पाच पेट्या देवगड हापूस वाशी मार्केट येथे रवाना झाल्या आहेत. देवगड तालुक्यामधून देवगड हापूसच्या यावर्षीच्या पहिल्या पेट्या पाठवण्याचा मान अरविंद वाळके यांना मिळाला आहे.
कुणकेश्वर वाळकेवाडी येथील आंबा बागायतदार अरविंद वाळके यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी ही देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केट येथे पाठवली होती. यावर्षीही देवगड तालुक्यामधून पहिल्या पाच पेट्या पाठवण्याच्या मान वाळके यांना मिळाला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस वाळके यांच्या आंबा कलमांना मोहर आला होता. कृषी तज्ज्ञांनुसार व कृषी सल्ला घेऊन त्यांनी कीटकनाशकांच्या मोहरावरती फवारण्या केल्या होत्या. या मोहराची व्यवस्थित मशागत केल्यामुळे योग्य प्रमाणात फळधारणाही झाली. त्यातील त्यांनी पाच डझनच्या पाच पेट्या मुंबई वाशी मार्केट येथे रवाना केल्या आहेत. त्यातील दोन पेट्या आकेशेजवळ तर तीन पेट्या संजय पानसरे या दलालांना पाठविल्या आहेत.