पहिला दिवस अफवांचाच
By admin | Published: February 9, 2015 10:59 PM2015-02-09T22:59:15+5:302015-02-09T23:55:15+5:30
हत्ती पकड मोहीम : प्रशिक्षित चारही हत्ती नानेलीच्या जंगलात
माणगाव : जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या जंगली हत्तींना पकडण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील पथकाने नानेलीच्या जंगलात ठाण मांडले आहे. मात्र, दिवसभराच्या परिश्रमानंतरही एकाही हत्तीला डार्ट मारण्यात वा पकडण्यात वन विभागाला यश आलेले नाही. मात्र, वन विभागाकडून या मोहिमेची कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्याने उपस्थितांमध्ये मात्र, विविध प्रकारच्या अफवांना जोर चढला होता.हत्ती पकड मोहिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची मानली जात असून या मोहिमेला यश प्राप्त होईल, असेही वनविभागाने यापूर्वीही सांगितले आहे. त्याचप्रमाणे या बहुचर्चित हत्ती पकड मोहिमेला संपूर्ण तयारीनिशी वनविभागाने सोमवारी सुरुवात केली. त्यानुसार सकाळपासूनच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी तयारी केली होती. नानेलीच्या जंगलात हत्ती असल्याचे खात्रीशीर वृत्त मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी सकाळीच नानेली जंगलाच्या वेशींवर तैनात करण्यात आले. तसेच नागरिकांना जंगलात जाण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास प्रशिक्षित चार हत्ती नानेलीच्या जंगलात विविध मार्गांनी जंगली हत्तींच्या शोधार्थ जंगलात गेले. या प्रशिक्षीत हत्तींसह कर्नाटकहून आलेले पथकाचे कर्मचारी व डॉ. उमाशंकर हेही उपस्थित होते. सकाळपासूनच प्रशिक्षीत हत्ती जंगली हत्तींचा मागोवा काढत जंगल परिसरात फिरत होते. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास नानेली ढेपगाळ परिसरात बापू बागवे या ग्रामस्थाने जंगली हत्ती पाहिल्याचे वनविभागाला कळविले. त्यानंतर वन कर्मचारी पाण्याचे कॅन घेऊन नानेलीच्या जंगलात जाऊ लागताच हत्तीला डार्ट मारल्याची चर्चा उपस्थितांत होऊ लागली. जंगलात कॅन घेऊन गेलेले कर्मचारी सुमारे अर्ध्या तासाच्या अंतराने परत मागे आले. यावेळी हत्तीला मारण्यात आलेला डार्ट चुकल्याने हत्ती पुन्हा माणगाव जंगलाच्या दिशेने गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनीही माणगाव जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा जंगली हत्तीला डार्ट मारल्याची माहिती मिळाली. मात्र, वनविभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने या मोहिमेबाबत उपस्थितांमध्ये अफवांचे पीक आल्याचे दिसून येत होते.
रात्री उशिरापर्यंत एकाही जंगली हत्तीला आंबेरीतील क्रॉलकडे आणण्यात आले नव्हते. तसेच कर्नाटकातून दाखल झालेले पथक प्रशिक्षीत हत्तींसह रात्री उशिरापर्यंत जंगली हत्तींचा माग काढत फिरत
होते. (प्रतिनिधी)
डॉक्टर वाट चुकले
सायंकाळी सहा वाजता माणगाव परिसरात रानटी हत्तींना पाहण्यात आले. मात्र, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हत्तीला डार्ट मारल्यानंतर डॉ. उमाशंकर जंगलात वाट हरवल्याचीही चर्चा उपस्थितांत रंगली होती.