पहिला दिवस वाया
By admin | Published: February 9, 2015 11:11 PM2015-02-09T23:11:40+5:302015-02-10T00:00:45+5:30
हत्ती पकड मोहीम : दोनवेळा ‘डार्ट’ मारल्याची शक्यता; अफवांना ऊत
माणगाव : माणगाव येथे हत्ती पकड मोहिमेची सुरुवात सोमवारी सकाळपासूनच करण्यात आली. सायंकाळपर्यंत दोनवेळा जंगली हत्तींना भूल देण्याच्या औषधांचा ‘डार्ट’ मारल्याची चर्चा सुरू होती. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. प्रशिक्षित हत्तींसह कर्नाटकाहून दाखल झालेले पथक रात्री उशिरापर्यंत नानेलीच्या जंगलात, हत्तींच्या शोधार्थ फिरत होते. परिणामी हत्ती पकड मोहिमेचा पहिला दिवस वाया गेल्याचे दिसून आले.हत्ती पकड मोहीम सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. नानेली येथील जंगलात हत्तींचे स्थान निश्चित करण्यात आल्यानंतर जंगल परिसराभोवती ठिकठिकाणी वन कर्मचारी उभे करण्यात आले होते. ११ वाजण्याच्या सुमारास चारही प्रशिक्षित हत्ती डॉ. उमा शंकर यांच्या नेतृत्वाखाली माणगावच्या दिशेने नानेली जंगलात दाखल झाले. नानेली जंगलात चार वाजेपर्यंत हत्ती शोधमोहीम सुरू होती. दोन हत्ती नानेलीच्या बाजूने ढेपगाळ परिसरात चारच्या सुमारास बापू बागवे यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्याबाबत वन अधिकाऱ्यांना कल्पना दिली. त्यानंतर हत्ती पकड मोहिमेस वेग येऊन वन कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. हत्तींना डार्ट मारला असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वन कर्मचारी पाण्याचा कॅन घेऊन जंगलात गेले. मात्र, पुन्हा अर्ध्या तासाने परत माघारी परत फिरले. यावेळी रानटी हत्तींनी पथकाला हुलकावणी देऊन पुन्हा माणगावच्या दिशेने वाटचाल केली होती.पुन्हा वन कर्मचारी माणगावच्या दिशेने गेले. हत्ती पकड मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सायंकाळी सहाच्या सुमारास माणगावच्या बाजूने रानटी हत्तीचे ग्रामस्थांना दर्शन झाले. दरम्यानच्या काळात डॉ. उमाशंकर डार्ट मारल्यावर वाट चुकून जंगलात राहिल्याचीही चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. प्रशिक्षित चारही हत्ती रात्री उशिरापर्यंत जंगलातच होते. या मोहिमेची अधिकृत माहिती कोणत्याही वन अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्यामुळे या मोहिमेबाबत उपस्थितांची संभ्रमावस्था कायम होती. (प्रतिनिधी)