स्वरमयी जिल्ह्यात प्रथम
By Admin | Published: June 18, 2014 12:33 AM2014-06-18T00:33:00+5:302014-06-18T00:59:56+5:30
दहावी निकाल : कुडाळ हायस्कूलची विद्यार्थिनी
कणकवली : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के लागला आहे. या परीक्षेत कुडाळ हायस्कूल कुडाळची स्वरमयी नंदन सामंत हिने ९८ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कणकवलीतील विद्यामंदिर हायस्कूलची स्नेहल विजय परब व एस.एम. हायस्कूलची मिताली भरत गावडे यांनी प्रत्येकी ९७.८0 टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक तर कुडाळ हायस्कूलच्या सायली वेंगुर्लेकर व सावंतवाडी येथील आर.पी.डी. हायस्कूलच्या राजेश अनंत सावंत याने प्रत्येकी ९७.६0 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
कणकवली विद्यामंदिरची श्रेया पाटील व एस. एम. हायस्कूलच्या मिताली पावसकर यांनी प्रत्येकी ९७.२0 टक्के गुण मिळविले आहेत. सिंधुदुर्गातील दहावीच्या परीक्षेसाठी १३ हजार ६७५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १३ हजार १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये ६ हजार ८२७ मुलगे तर ६ हजार ३६२ मुलींचा समावेश आहे. गतवर्षीही राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा ‘टॉपर’ ठरला होता. यशाची ही परंपरा कायम राखत यावर्षीही पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात टॉपर ठरला आहे. (वार्ताहर)