बागवाडीत सुरूच्या बनाला आग : दोन दिवसांनी आग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 04:52 PM2020-03-13T16:52:34+5:302020-03-13T16:53:45+5:30
कुणकेश्वर : मिठमुंबरी बागवाडी येथील सुरुच्या बनाला अचानक लागलेल्या आगीचा भडका अखेर दोन दिवसानंतर आटोक्यात आणण्यात आला. यामुळे सामाजिक ...
कुणकेश्वर : मिठमुंबरी बागवाडी येथील सुरुच्या बनाला अचानक लागलेल्या आगीचा भडका अखेर दोन दिवसानंतर आटोक्यात आणण्यात आला. यामुळे सामाजिक वनीकरणाच्यावतीने लागवड करण्यात आलेल्या सुरुच्या बनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिठमुंबरी बागवाडी येथील वस्तीपासुन काही अंतरावर असणाºया खासगी जागेत सामाजिक वनीकरण विभागाने सुरुची व अन्य झाडांची लागवड केली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्या ठिकाणी धुरांचे लोळ तेथील स्थानिकांना हवेत दिसू लागल्याने ग्रामस्थांनी पाहणी केली असता सुरुच्या बनातील आतील भागात आग लागल्याचे दिसून आले.
यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ देवगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून महाकाय आगीची माहिती दिली.
यावरुन देवगड पोलिसांनी आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली अग्निशमन दलाची बंबगाडी मागविण्यात आली. मात्र, बंबगाडीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यास बुधवारी रात्रीपर्यंत प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, सोसाट्यचा वारा असल्यामुळे आग आटोक्यात येणे अशक्य होत होते.
अखेर गुरुवारीही सकाळपासूनच आगीचे तांडव दिसतच होते. अखेर गुरुवारी दुपारनंतर ही आग आटोक्यात आल्याचे सांगण्यात आले. या आगीमुळे सुरुच्या बनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा पंचनामा महसूल विभागाच्यावतीने करण्यात आला.