अकरावीची पहिली यादी जाहीर
By admin | Published: July 3, 2014 11:57 PM2014-07-03T23:57:10+5:302014-07-03T23:58:12+5:30
दुसरी यादी ८ जुलैला : विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमध्ये गर्दी
कणकवली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीतील प्रवेशाचे वेध लागले होते. गुरूवारी पहिली निवड यादी जाहीर करण्यात आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेक महाविद्यालयांनी ही निवड यादी आपल्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.
दहावीच्या निकालानंतर २७ जून ते २ जुलै या कालावधीत अकरावी प्रवेशासाठी अर्ज वितरीत करण्यात आले होते. यावर्षी जिल्ह्यात ३ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य श्रेणी तर ५ हजार २२७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. १६ जुलै रोजी अकरावीचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी ९ जुलैला निवड यादीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
गुरूवारी महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाप्रमाणे अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली. कणकवली महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेसाठी खुल्या प्रवर्गामधून ९७.८० टक्के गुणांपासून सुरु झालेली ही यादी ९१.८० टक्केवर बंद झाली. इतर मागास प्रवर्गामधून ९१.८० टक्के गुणांपासून सुरू झालेली यादी ८७.६० टक्केवर बंद झाली. वाणिज्य शाखेसाठी खुल्या प्रवर्गामधून ९५.६० टक्के गुणांपासून सुरु झालेली ही यादी ८४.२० टक्केवर बंद झाली. इतर मागास प्रवर्गामधून ८३.८० टक्के गुणांपासून सुरू झालेली यादी ७७.६० टक्केवर बंद झाली. कला शाखेसाठी खुल्या प्रवर्गामधून ८४.४० टक्के गुणांपासून सुरु झालेली ही यादी ५६ टक्केवर बंद झाली. इतर मागास प्रवर्गामधून ६६.४० टक्के गुणांपासून सुरू झालेली यादी ५६.२० टक्केवर बंद झाली. तर व्होकेशनलमधील अकाऊंटींग अॅण्ड आॅडिटींग या विषयासाठी ७९.८० टक्केपासून ४९.४० टक्के, पर्चेसिंग अॅण्ड स्टोअर किपिंग विषयासाठी ६४.८० टक्केपासून ४३.४० टक्के, आॅफिस मॅनेजमेंटसाठी ६५.४० टक्केपासून ४४.४० टक्के तर टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल टेक्निक्स या विषयासाठी ६६.८० टक्केपासून ५४.२० टक्के गुणांवर ही यादी बंद करण्यात आली आहे. बहुतांशी महाविद्यालयात अशीच स्थिती होती. (वार्ताहर)