दाभोळेतील ‘स्वीटकॉर्नर’वर प्रक्रिया देशातील पहिली यंत्रणा
By admin | Published: February 1, 2016 12:37 AM2016-02-01T00:37:24+5:302016-02-01T00:37:24+5:30
जयंतीभाई भाडेसिया : जामसंडे येथील उद्घाटन समारंभात मार्गदर्शन
देवगड : दाभोळे येथील आंबा फळ प्रक्रिया केंद्रामध्ये स्वीटकॉर्नवर प्रक्रिया करणारी पूर्णपणे स्वयंचलित असलेली ही यंत्रणा थायलंड येथून आयात केलेली असून देशातील ही पहिलीच यंत्रणा आहे. तसेच चांगले विचार समृद्ध जीवन घडवण्यास उपयोगी ठरतात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्राचे संघचालक जयंतीभाई भाडेसिया यांनी व्यक्त केले.
जामसंडे येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या तालुक्यातील दाभोळे येथील फळप्रक्रिया प्रकल्पात नीना अॅग्रोटेक या कंपनीने स्वीटकॉर्नवर प्रक्रिया करणारी स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. याचे उद्घाटन रविवारी भाडेसिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. अजित गोगटे, सुनील काळे, हसमुखभाई पटेल, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अभिजीत पाटील, अॅक्सीस बँकेचे शिरीष भिवटे, प्रकाश अभ्यंकर, विद्याधर माळगांवकर आदी उपस्थित होते. यावेळी भाडेसिया यांचा अॅड. गोगटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संघाचे तालुक्यातील ज्येष्ठ स्वयंसेवक शांताराम कर्णिक, बाबूराव भुजबळ, शांताराम घाडी, धोंडू लांजवळ आदींचा भाडेसिया यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
भाडेसिया म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने सकारात्मदृष्टया विचार करून आपल्या गुणांचा यशस्वीरित्या वापर केल्यास कुठल्याही क्षेत्रामध्ये मनुष्य कधीही मागे राहू शकत नाही. व्यक्तीगत स्वार्थ विसरून समाज पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असणारे प्रसिद्धीपासून दूर असतात. कल्याणकारी समाज घडवण्यासाठी त्यागाची भावना आवश्यक असते. लोकांच्या कल्याणातच आपले कल्याण मानणारा समाज घडवणे गरजेचे आहे. सुदृढ समाज घडवण्यासाठी अंगी त्यागाची भावना असावी लागते. संघ ही एक निस्वार्थीपणे काम करणारी शृंखला आहे. जीवनात परिवर्तनाबरोबरच नवीन विचार आत्मसात केले पाहिजेत. निस्वार्थी माणसेच चांगले काम घडवत असल्याचे सांगितले.
अॅड. गोगटे म्हणाले की, दाभोळे येथील फळ प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून बेबीकॉन प्रॉडक्टची आज परदेशवारी केली जाते. ग्रामीण भागातून अशा प्रकिया केंद्राच्या माध्यमातून परदेशवारी होणे म्हणजे ही एक फार मोठी कौतुकाची बाब आहे. तसेच स्वीटकॉर्नची अद्ययावत स्वयंचलित यंत्रणा ही थायलंडवरून आयात केली असून अशी ही यंत्रणा देशातील पहिलीच यंत्रणा असून ही यंत्रणा बसवण्याचा आढावा घेऊन आंब्याबरोबरच बेबीकॉर्न, स्वीटकॉर्नमुळे कायम फॅक्टरी सुरू राहून रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल असे सांगितले.
यावेळी पाटील, अभ्यंकर, भिवटे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मिलिंंद केरकर, लालजीभाई पटेल, दिलीप देशमुख, प्रविण मणीयार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रेश्मा जोशी यांनी केले. आभार अजय जोशी यांनी
मानले. (प्रतिनिधी)