पहिल्या पावसात सिंधुदुर्गनगरी बनली तुंबानगरी, रस्त्याला आले तळ्याचे स्वरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:11 PM2023-06-24T12:11:04+5:302023-06-24T12:12:36+5:30
निद्रिस्त प्राधिकरण जागे कधी होणार!
ओरोस : बीपरजॉय वादळामुळे लांबलेल्या पावसाने आज जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. आज सकाळी ११ च्यासुमारास चांगला पाऊस पडला. मात्र या पहिल्याच पावसाने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील रस्त्यांवर तळ्याचे साम्राज्य निर्माण केले आहे. त्यामुळे ही सिंधुदुर्गनगरी आहे की तुंबलेलीनगरी असा प्रश्न निर्माण होत आहे.
ठीक ठिकाणी रस्तावर पाणी साचून राहत असल्याने या रस्त्यावर जाणाऱ्या वाहन चालकांसह फुटपाथ वरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना ही त्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गेली कित्येक दिवस झोपी गेलेली प्राधिकरणाच्या यंत्रणा कधी जागी होणार असा प्रश्न वाहन चालक आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात असला.
शेतकरी राजाही पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. शेतीची कामे रखडली होती. मात्र आज सकाळ पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सकाळी ११ च्यासुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. दिवसभरात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असला तरी जिल्ह्याच्या राजधानीत मात्र पडलेला पाऊस नागरिक आणि वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी मधील रस्त्यावर ठीक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. पाण्याच्या या डबक्या मध्ये रस्ता हरवला आहे. रस्त्यावर पूर्ण पाणी असल्याने वाहन चालकांना या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तर फुटपाथ वरून चालणाऱ्या नागरिकांवर हे साचलेले पाणी वाहन गेल्यावर उडत असल्याने नागरिकही हैराण झाले आहे. त्यात चिकल साचला असल्याने तो उडून वाहन चालक आणि येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकाचे कपडेही खराब होत आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर ठीक ठिकाणी पाणी साचून राहिले असल्याने सिंधुदुर्गनगरी तुंबलेलीनगरी दिसून येत होती.
निद्रिस्त प्राधिकरण जागे कधी होणार!
सिंधुदुर्गनगरी मधील विविध रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचाण्याचे प्रकार गेली कित्येक वर्षे होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यालगतची गटार आणि पाण्याचा निचरा होणारी ठिकाण यांच्या साफसफाई होणे अपेक्षित होते. मात्र प्राधिकरण कडून त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आला आहे. त्यामुळे गेली कित्येक दिवस झोपी गेलेली प्राधिकरणाच्या यंत्रणा कधी जागी होणार असा प्रश्न वाहन चालक आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.