ST Strike : कणकवली-सावंतवाडी मार्गावर २८ दिवसानंतर धावली पहिली लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 04:38 PM2021-12-06T16:38:35+5:302021-12-06T16:39:44+5:30
उद्या, मंगळवार पासून आणखी काही कर्मचारी सेवेत रूजू होतील. त्यामुळे आणखी एस.टी. फेर्या सुरू होतील असा विश्वास विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी व्यक्त केला.
कणकवली : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ करुन यावर तोडगा देखील काढला. तरी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. सरकारने अनेक कर्मचाऱ्यांवर बडतर्फेची कारवाई केली आहे. तर काही कर्मचारी कारवाईच्या भितीपोटी कामावर हजर झाले आहेत. परिणामी एसटीची वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली आहे.
सिंधुदुर्गातील एस.टी. कर्मचारी ही गेल्या २८ दिवसांपासून संपावर आहेत. यात सर्व चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी सहभागी झाल्याने एकही एस.टी.फेरी सुटली नव्हती. मात्र, सोमवारी कणकवली-सावंतवाडी मार्गावर पहिली एस.टी. बस फेरी रवाना झाली.
यावेळी वाहकाची जबाबदारी बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकावर देण्यात आली होती. मंगळवार पासून आणखी काही कर्मचारी सेवेत रूजू होतील. त्यामुळे आणखी एस.टी. फेर्या सुरू होतील असा विश्वास विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी व्यक्त केला.
कणकवली बसस्थानकात दुपारी दोन वाजता सुटलेल्या कणकवली-सावंतवाडी एस.टी. बसचा शुभारंभ विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केला. यावेळी आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर तसेच इतर एस.टी. अधिकारी उपस्थित होते. कणकवली स्थानकातून चार प्रवासी सावंतवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाले.