‘प्लास्टिक मुक्त’साठी मसुरेचे पहिले पाऊल
By admin | Published: October 4, 2015 10:08 PM2015-10-04T22:08:30+5:302015-10-04T23:52:02+5:30
प्रभावी जनजागृती करणार : ग्रामपंचायतीचा पुढाकार
मालवण : हागणदारीमुक्तीच्या यशानंतर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’साठी तालुक्यातील मसुरे ग्रामपंचायतीने प्लास्टिक निर्मूलनाचे पहिले पाऊल टाकले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आवाहनाला मसुरे ग्रामपंचायतीने प्रतिसाद देत गतिमानतेने प्लास्टिक बंदीची मोहीम राबवली जाणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर व सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
मालवण तालुका हागणदारीमुक्त होऊन निर्मलग्राम तालुक्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
मसुरे ग्रामपंचायत २००८ साली हागणदारीमुक्त व निर्मलग्राम झाली आहे. प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करताना शासनाने उत्पादन बंदी केल्यास प्लास्टिक बंदी तळागाळापर्यंत राबवणे शक्य होईल अशीही भूमिका घेण्यात आली. ग्रामपंचायतीचे सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. व मंजुरीनंतर तो अंमलातही आणला जाईल. जिल्हा परिषदेने ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ जिल्ह्याची हाक दिल्याने अधिक गतिमानतेने मसुरेत जनजागृती केली जाईल असे प्रभुगावकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्लास्टिक मुक्तीची जनजागृती करणार
मसुरे गावात प्लास्टिक बंदीबाबत २००८ पासून जनजगृती केली जाते. त्यावेळी तत्कालीन सरपंच संग्राम प्रभुगावकर यांनी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली होती. त्यामुळे मसुरेवासीयांना प्लास्टिकमुक्तीचा नारा माहित असून गावात काही प्रमाणातच प्लास्टिकचा वापर होत आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती करताना सर्वांना विश्वासात घेतले जाणार आहे. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी सरपंच व वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न राहतील, असे सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी प्लास्टिक मुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले.