मत्स्य विभागाची हायस्पीड नौकेवर कारवाई, हिक्का वादळाचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:18 PM2019-09-28T13:18:00+5:302019-09-28T13:21:57+5:30
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड नौकांची घुसखोरी सुरूच आहे. बुधवारी मध्यरात्री १९ वाव खोल समुद्रात हायस्पीड नौकांकडून मासळीची लूटमार सुरू होती. यावेळी समुद्रात हिक्का वादळाचा प्रभाव असताना मत्स्य विभागाने थरार नाट्यानंतर एका नौकेला जेरबंद केले आहे.
मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड नौकांची घुसखोरी सुरूच आहे. बुधवारी मध्यरात्री १९ वाव खोल समुद्रात हायस्पीड नौकांकडून मासळीची लूटमार सुरू होती. यावेळी समुद्रात हिक्का वादळाचा प्रभाव असताना मत्स्य विभागाने थरार नाट्यानंतर एका नौकेला जेरबंद केले आहे.
या नौकेत लाखो रुपयांची म्हाकूल व वाघोटी मासळी सापडून आली. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बंदोबस्तात मत्स्य विभागाने धाडसी कारवाई करून दाखविल्याने मच्छिमारांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच वादळामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.
मत्स्य विभाग अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचे आरोप मच्छिमारांकडून केले जातात. मात्र, मत्स्य विभागातील रिक्त पदे भरण्यात आल्यानंतर सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांनी कारवाई मोहीम तीव्रपणे राबविण्याचे धोरण अवलंबिले आहे.
मालवण समुद्रात बुधवारी मध्यरात्री ११.३० च्या सुमारास सुमारे १९ ते २० वाव खोल समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या मेंगलोर (कर्नाटक) येथील फ्लॅवी डिसोझा यांच्या मालकीच्या एसटी-अँथोनी या हायस्पीड नौकेला पकडण्यात आले.
मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी शिवराज चव्हाण आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात खलाशांच्या साथीने कारवाईसाठी रवाना झाले. रात्रीच्या वेळी समुद्रात घोंघावणाऱ्या हिक्का वादळाचा प्रभाव होताच. तरीदेखील शेकडोंच्या संख्येने घुसखोरी करीत असलेल्या नौकांना पकडण्यासाठी फिल्डींग लावली.
मात्र, हायस्पीड नौकांच्या कळपाने गस्तीनौकेला घेरण्याचा प्रयत्न केला. तब्बल तासाभराच्या थरारानंतर एका हायस्पीड नौकेतील खलाशांसह परवाना व अन्य कागदपत्रे मत्स्य अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत कारवाई केली.
मत्स्य विभागाकडून मासळीचा लिलाव सुरू असताना हौशे-नौशे मत्स्य खवय्ये सकाळपासून मासळी उचलून नेत होते. त्यामुळे मच्छी मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने आमच्या मत्स्य विक्रीवर मासळी लिलावाचा मोठा फटका बसला, असा आरोप मच्छी विक्रेत्या महिलांकडून करण्यात आला.
मच्छी विक्रेत्या महिलांनी लिलावाच्या ठिकाणी येऊन मत्स्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महिला व मत्स्य अधिकाऱ्यांमध्ये वाद अधिकच वाढल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात मासळीचा लिलाव करण्यात आला.
हिक्काच्या तावडीतून बचावले
समुद्रातून मालवण बंदरात परतत असताना हिक्का वादळाच्या तडाख्यात गस्तीनौका सापडली. त्यानंतर काहीवेळाने वादळ शांत झाल्यानंतर मालवण बंदरात गुरुवारी पहाटे ३.३० वाजता हायस्पीड नौकेसह दाखल झाले. कारवाई केलेल्या नौकेवरील म्हाकूल व अन्य प्रकारच्या लाखो रुपयांच्या मासळीचा लिलाव सायंकाळपर्यंत मालवण मच्छी मार्केटनजीक सुरू होता. लिलावानंतर नौकेवर कारवाईचा प्रस्ताव मालवणचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे सादर केला जाणार आहे, असे परवाना अधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मासेमारी नौका बंदरातच स्थिरावल्या
अरबी समुद्राच्या मध्यभागी घोंगावणाऱ्या हिक्का वादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिसून येत आहे. समुद्रात वादळाच्या स्थितीमुळे मोठ्या नौका बंदरातच स्थिरावल्या आहेत. त्यामुळे मासेमारीवरही परिणाम झाला आहे. मासेमारीस जाणाऱ्या मोठ्या नौका वादळामुळे मासेमारीस गेल्या नाहीत. नौकांनी बंदरातच स्थिरावण्याचा निर्णय घेतला. वादळाचा परिणाम आणखीन दोन दिवस कायम राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.