पारंपरिक मच्छिमारांनी मत्स्य अधिकाºयांना विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:27 PM2019-04-12T17:27:18+5:302019-04-12T17:30:09+5:30
जानेवारी महिन्यापासून पर्ससीन नौकांना बंदी असूनही पर्ससीन नौकांद्वारे व एलईडीद्वारे उघडपणे मासेमारी केली जात आहे. याकडे मत्स्य व्यवसाय खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यावर दोन दिवसांत मत्स्य परवाना
देवगड : जानेवारी महिन्यापासून पर्ससीन नौकांना बंदी असूनही पर्ससीन नौकांद्वारे व एलईडीद्वारे उघडपणे मासेमारी केली जात आहे. याकडे मत्स्य व्यवसाय खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यावर दोन दिवसांत मत्स्य परवाना अधिकारी यांच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्यास देवगड बंदराबाहेर एकही पर्ससीन नौका जाऊ देणार नाही, असा इशारा पारंपरिक मच्छिमार बांधवांनी मत्स्य विभाग कार्यालयावर धडक देत परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला यांना दिला आहे.
मासेमारी बंदी कालावधीतही अनधिकृत पद्धतीने पर्ससीन नौका, एलईडी लाईटद्वारे खुलेआम मच्छिमारी होत आहे. मात्र, या मच्छिमारीवर कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही. कारवाई करण्याकरीता मत्स्य परवाना अधिकारी निष्क्रिय असून मच्छिमारांच्या व्यथा त्यांना दिसत नाहीत का? असा सवाल पारंपरिक मच्छिमार बांधवांनी उपस्थित करून मत्स्य परवाना अधिकारी महाडवाला यांना धारेवर धरले. तसेच पारंपरिक मच्छिमारांवर पर्ससीन नौका, एलईडी मच्छिमारीमुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून येत्या दोन दिवसांत या पर्ससीन नौकांवर मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत ठोस कारवाई न झाल्यास देवगडमधील पारंपरिक मच्छिमार आपल्या नौका देवगड नस्तामध्ये उभ्या करून ठेवतील व पर्ससीन नौकांना बंदराबाहेर जाण्यास मज्जाव केला जाईल.
याबाबत होणाºया परिणामास सर्वस्वी मत्स्य व्यवसाय खाते जबाबदार राहील असा इशाराही मच्छिमारांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी तालुक्यातील पर्ससीन धारकांची यादीच पारंपरिक मच्छिमार बांधवांनी परवाना अधिकारी यांच्याकडून मागून घेतली. यावेळी पारंपरिक मच्छिमार जगन्नाथ कोयंडे, ज्ञानेश्वर खवळे, उमेश खवळे, भाऊ कुबल, बाळू बांदेकर, उमेश आंबेरकर, गणेश कुबल, बाळा कोयंडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
मत्स्य परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला यांना पारंपरिक मच्छिमार बांधवांनी जाब विचारला.