हायस्पीड नौका पकडली मत्स्य विभागाची कारवाई : देवगड समुद्रात अनधिकृत मच्छिमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:08 AM2019-10-12T00:08:11+5:302019-10-12T00:11:25+5:30
मत्स्यव्यवसाय विभागाची ‘शीतल’ ही गस्तीनौका शुक्रवारी पहाटे समुद्रात गस्त घालण्यासाठी गेली होती. देवगड समुद्र्रात कुणकेश्वरसमोर १८ वावमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करताना परप्रांतीय हायस्पीड नौका आढळल्याने त्यांचा पाठलाग केला.
देवगड : देवगड समुद्र्रात कुणकेश्वरसमोर १८ वावमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करताना परप्रांतीय हायस्पीड नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने पकडले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास केली. देवगडमध्ये आठ दिवसांत मत्स्यव्यवसाय विभागाने केलेली ही दुसरी कारवाई आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाची ‘शीतल’ ही गस्तीनौका शुक्रवारी पहाटे समुद्रात गस्त घालण्यासाठी गेली होती. देवगड समुद्र्रात कुणकेश्वरसमोर १८ वावमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करताना परप्रांतीय हायस्पीड नौका आढळल्याने त्यांचा पाठलाग केला. यावेळी कर्नाटक मलपी- उडपी येथील अशोक कोट्टीयान यांच्या मालकीची श्री सानिद्धि ही नौका पकडण्यात गस्ती नौकेला यश आले.
त्यानंतर पकडलेल्या नौकेला पुढील कारवाईसाठी देवगड बंदरात आणण्यात आले. या नौकेवर सात कर्मचारी असून ही कारवाई परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, सागर सुरक्षारक्षक संदेश नारकर, धाकोजी खवळे, हरेश्वर खवळे या टीमने केली.
जाळी तोडल्याने नुकसान
पकडलेल्या नौकेवरील मासळीच्या लिलावाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. देवगडमध्ये खोल समुद्रात परप्रांतीय हायस्पीड नौेकांचा धुडगूस सुरूच असून बुधवारी रात्री देवगडमधील दोन नौकांची जाळी हायस्पीड नौकांनी तोडल्याने नौकामालकांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.