परिस्थितीनुसार बदल केल्यास मासेमारीला यश
By admin | Published: April 29, 2015 10:02 PM2015-04-29T22:02:37+5:302015-04-30T00:29:20+5:30
संजय भावे : वेंगुर्ले तालुक्यातील सागरेश्वर येथे मच्छिमारांना प्रशिक्षण
कुडाळ : देशातील किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छिमारांचे चरितार्थाचे मुख्य साधन मासेमारी असून, बदलत्या परिस्थितीनुसार यात आवश्यक असणारे बदल करून ती पथ्ये काटेकोरपणे पाळल्यास शाश्वत मासेमारी ही संकल्पना फक्त कागदावर न राहता ती प्रत्यक्षात सहजपणे उतरू शकेल. तसेच ज्या सागराने मच्छिमारांच्या अगणित पिढ्यांना जीवन दिले आहे, त्या समुद्र परिसंस्थेला वाचवण्याकरिता मच्छिमार समाजाने एकत्र येऊन एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी ‘शाश्वत मासेमारीकरिता मच्छिमारांचा क्षमता विकास’ या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची मत्स्यविद्याशाखा, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएमडीपी), जीईएफ व भारत सरकारचा वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत मच्छिमारांचा क्षमता विकास’ या विषयावरील एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील मच्छिमारांकरिता सागरेश्वर येथील एका रिसोर्टवर आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला मत्स्य महाविद्यालय रत्नागिरीच्या कृषी अर्थशास्त्रज्ञ व सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश शिरधनकर, गोड्यापाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे मत्स्यवैज्ञानिक डॉ. नितीन सावंत, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम सिंधुदुर्ग प्रकल्पाच्या प्रतिनिधी दुर्गा ठिगळे, विषयतज्ज्ञ डॉ. केतनकुमार चौधरी, डॉ. रवींद्र पवार, संदेश पाटील व मोठ्या संख्येने पुरुष व महिला मच्छिमार प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित प्रशिक्षणार्थिंना विषयतज्ज्ञांनी सागरी मासेमारी, नियमन कायदे, शाश्वत मासेमारीची संकल्पना व त्याची उद्दिष्टे, जबाबदार मासेमारी, परिसंस्थीय मासेमारी व्यवस्थापन, मत्स्य व्यवसायातील पूरक उद्योग आदी महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन
केले.
तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थींबरोबर चर्चा केली आणि त्यांच्या व्यवसायाच्या सद्यस्थितीबाबतही माहिती संकलित केली. मच्छिमारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन यावेळी विषयतज्ज्ञांनी केले. कार्यक्रमाला सुमारे ७५ मच्छिमार प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मंगेश शिरधनकर, आभार डॉ. केतनकुमार चौधरी यांनी मानले. (प्रतिनिधी)
समुद्र परिसंस्थेला वाचवण्याकरिता मच्छिमारांनी एकत्र येण्याची गरज : भावे.
अनेक मच्छिमारांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ.
मच्छिमारांच्या शंकांचे केले निरसन.
‘शाश्वत मासेमारीकरिता मच्छिमारांचा क्षमता विकास’ या विषयावरील प्रशिक्षण.