मच्छीमारांना समुद्रात असतानाही संपर्क शक्य

By Admin | Published: March 6, 2016 10:02 PM2016-03-06T22:02:34+5:302016-03-07T00:35:34+5:30

विनायक राऊत : बीएसएनएल दुर्गम भागात उभारणार ९६ टॉवर्स

Fishermen can be contacted even when at sea | मच्छीमारांना समुद्रात असतानाही संपर्क शक्य

मच्छीमारांना समुद्रात असतानाही संपर्क शक्य

googlenewsNext

रत्नागिरी : आता ग्रामीण भागातही भारत दूरसंचार निगमने आपले जाळे निर्माण केले आहे. अधिकाधिक दुर्गम भागातील नागरिकांचा तसेच समुद्रातील मच्छीमारांचा संपर्क सहजगत्या व्हावा, यासाठी बीएसएनएलने नवीन ९६ टॉवर्सची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शनिवारी रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली.
टेलिफोन सल्लागार समितीची पहिलीच बैठक खासदार राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जेलरोड येथील संचार भवनमध्ये झाली. यावेळी समिती सदस्य बंड्या साळवी, बाळा कदम, संतोष गोवळे, बीएसएनएलचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग, महाप्रबंधक सुहास कांबळे, उपमहाप्रबंधक आर. जी. गदगकर, अमृता लेले, जनसंपर्क अधिकारी योगेश भोंगले आदी उपस्थित होते.
या बैठकीत राऊत यांनी घेतलेल्या आढाव्याची माहिती पत्रकारांना दिली. बीएसएनएलचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळून ४० हजार दूरध्वनी ग्राहक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख, तर रत्नागिरीत २ लाख ११ हजार मोबाईलधारक आहेत. या ग्राहकांना थ्रीजीची सेवा ८१ टॉवर्सद्वारे, तर टूजीची सेवा २२ टॉवर्सद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. २०१५ सालापासून बीएसएनएलने चांगली सेवा दिल्याने २०१० ते २०१४ या कालावधीत शेवटच्या क्रमांकावर असलेल्या बीएसएनएलने प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. महाप्रबंधक सुहास कांबळे यांच्या कामाचे यावेळी राऊत यांनी कौतुक केले.
समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या खलाशांना मोबाईल सेवेचा लाभ मिळत नसल्याने, संपर्क करणे अवघड बनते. संदेश वहनाची प्रक्रिया जलद होण्यासाठी आता या दोन्ही जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर २६ आणि अतिदुर्गम भागात ७६ मिळून एकूण ९६ नवीन टॉवर्स बीएसएनएलकडून उभारण्यात येणार आहेत. तसेच सेवेत खंड पडू नये, यासाठी स्थानिक बेरोजगारांना दुरूस्तीचे प्रशिक्षण देऊन ‘गाव मित्र’ म्हणून नेमण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मंडणगड, खेड, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यांतील ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात फायबर आॅप्टिकल नेटवर्कने जोडल्या जाणार असून, ही प्रक्रिया ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होणार आहे. उर्वरित पाच तालुके हे दुसऱ्या टप्प्यात जोडले जाणार आहेत. सर्व ग्रामपंचायतींना या सेवेसाठी प्रत्येकी १८ लाख रूपयांचे साहित्य केंद्राकडून मोफत दिले जाणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
माचाळ, नेदरवाडी, गांग्रई, यासारख्या अतिदुर्गम भागात बीएसएनएल आता प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सेवा देणार आहे. साटवलीसारख्या भागात १५ वर्षानंतर प्रथमच मोबाईल सेवा सुरू झाली आहे.
बीएसएनएलचे दोन्ही जिल्ह्यात मिळून २१६ टॉवर्स सध्या कार्यरत आहेत. मोबाईलच्या कनेक्टिव्हीटीचे प्रमाण ९१.२१ टक्के इतके आहेत. २०१७ सालापर्यंत हे प्रमाण १०० टक्के होईल, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)


बीएसएनएल : रत्नागिरी जिल्हा प्रथम.
बीएसएनएलची सेवा आणि ग्राहक वाढ यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे राज्यात पहिल्या तीन क्रमांकात आहेत.


पन्नास हजार ग्राहक
गेल्या चार महिन्यात रत्नागिरी जिल्ह््यात पन्नास हजार ग्राहक वाढले आहेत. सीमकार्डचा हा खप संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे.

Web Title: Fishermen can be contacted even when at sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.