मच्छिमारांना मिळणार आठ कोटींचा परतावा
By admin | Published: November 10, 2015 11:29 PM2015-11-10T23:29:56+5:302015-11-10T23:52:45+5:30
दिवाळीनंतर वितरण : अद्याप १२ कोटी रुपये बाकी
रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना दिवाळी भेट मिळाली असून, तब्बल सात महिन्यांनी आठ कोटींचा डिझेल परतावा जाहीर झाला आहे. २0 कोटी परताव्यापैकी आठ कोटी रुपये मंजूर झाले असून, दिवाळीनंतर त्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सहायक मत्स्य आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी दिली.
मच्छिमारांचा २० कोटींचा परतावा देणे शिल्लक आहे. आमदार उदय सामंत यांच्याकडे मच्छिमारांनी कैफियत मांडली होती. आमदार सामंत यांनी विधानसभेत प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे प्रलंबित २० कोटींपैकी आठ कोटींचा परतावा सोमवारी जमा झाला आहे. डिसेंबर २०१४पर्यंत ७.५ कोटी, त्यानंतर दोन कोटी व मार्च २०१५ मध्ये दोन कोटी मिळून एकूण ११.५ कोटी रुपयांचा परतावा मच्छिमारांना मिळाला होता. त्यानंतर आता आठ कोटींचा परतावा प्राप्त झाला आहे. आतापर्यंत १९.५ कोटी रुपयांचा डिझेल परतावा प्राप्त झाला आहे. अजूनही २० कोटी डिझेल परताव्याची आवश्यकता आहे. शासनाने मार्चनंतर तब्बल सात महिन्यांच्या विलंबाने डिझेल परतावा दिला आहे. मच्छिमारांना खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जावे लागते. त्यामुळे खलाशांचा पगार, डिझेल, बर्फ तसेच अन्य देखभाल खर्च लक्षात घेता त्या तुलनेत मासे न सापडल्यास मच्छिमारांचे नुकसान होते. त्यामुळे वेळेवर डिझेल परतावा देण्यात यावा, अशी मागणी मच्छिमारांकडून होत आहे. (प्रतिनिधी)