चार महिने मच्छीमारी बंदच; नौकामालक हवालदिल

By admin | Published: August 26, 2016 12:39 AM2016-08-26T00:39:45+5:302016-08-26T01:12:53+5:30

व्यवसायच डबघाईला : मच्छीमारांची आर्थिक स्थिती हलाखीची--मच्छिमारांचे भवितव्य अंधारमय भाग- २

Fishermen shut for four months; Navigator hovering | चार महिने मच्छीमारी बंदच; नौकामालक हवालदिल

चार महिने मच्छीमारी बंदच; नौकामालक हवालदिल

Next

रहिम दलाल -- रत्नागिरी  -चार महिने मासेमारी बंद राहिल्याने मच्छीमारांची परिस्थिती फार बिकट व हलाखीची बनल्याने अनेक मालकांनी नौका विक्रीला काढल्या आहेत. शासनाने घेतलेल्या तडकाफडकी निर्णयामुळे चार महिने मासेमारी बंद राहिल्याने अनेक मच्छीमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्यात सुमारे ४०० पर्ससीन नौका आहेत. एका नौकेवर सुमारे २५ ते ३० खलाशी काम करतात. त्यामुळे त्यांची एकूण संख्या पाहता १० हजार ते १२ हजार एवढी होती. शिवाय पर्ससीननेट मासेमारी व्यवसायावर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामध्ये मासे कापणाऱ्या महिला ४०००, बर्फ कारखान्यातील कामगार ७००, टेम्पो व्यावसायिक ३००, ट्रक व्यावसायिक २००, जाळी दुरुस्त करणारे कामगार १५००, मासे खरेदी विक्री करणाऱ्या महिला व्यावसायिक ५००, मच्छी प्रक्रिया करणारे फीश मिल व्यावसायिक व कामगार १०००, मच्छी खरेदी-विक्री करणारे पुरवठादार व त्यावर अवलंबून असणारे कामगार- १००० यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सागरी अधिनियम १९८१अंतर्गत पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. त्याचे परिणाम खोलवर झाल्याचे दिसून येत आहेत. आज मासेमारी सुरु झाली असली तरी अद्याप निम्म्यापेक्षा जास्त नौका बंदरातच नांगरावर आहेत. त्यामुळे मासेमारी सुरू होऊनही चार महिने मासेमारी बंद राहिल्याने त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. मासेमारीसाठी आवश्यक असलेला खलाशीवर्ग नसल्याने अनेक नौका बंद स्थितीत आहेत. मच्छीमारांकडे पैसा नसल्याने ते डबघाईला आले आहेत.
बहुतांश मच्छिमारांनी पर्ससीन जाळ्यांच्या नौका बँकांकडून, खासगी वित्त संस्थांकडून कर्ज घेऊन बांधलेल्या आहेत. तसेच अनेक मच्छीमार सावकारी कर्जाच्या पाशातही अडकले आहेत. बंदच्या कालावधीमध्ये अनेक नौकामालकांनी खलाशांसह त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा भार उचलला होता. तसेच नौकांची निगा राखण्यासाठी स्वत:कडील जमा असलेले दागदागिने विकले. येणाऱ्या हंगामामध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय करुन कमाई होईल, या आशेवर खलाशांनाही अ‍ॅडव्हान्स रकमा दिल्या होत्या. मात्र, आता खलाशांनीही पाठ फिरविली.
मासेमारी बंदीमुळे नौका बंद राहिल्याने बँकांचे लाखो रुपयांचे हप्ते थकले आहेत. शिवाय सावकारांकडून घेतलेल्या व्याजी रकमांचेही हप्ते वेळेवर न गेल्याने दामदुप्पटीने पैशांची वसूली करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. तसेच बँकांनीही कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावल्याने नौकामालक अडचणीत आले आहेत. अनेकांनी आपल्या मासेमारी नौका विक्रीला काढल्या आहेत. काहींनी तर कर्जाचा बोजा राहू नये, यासाठी कमी किमतीत नौका विकल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. त्यामुळे मच्छीमार आज फार हलाखीच्या स्थितीत जगत आहे. तब्बल चार महिने मासेमारी बंद राहिल्याने ही परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे.


शासनाने पर्ससीन नेटने व मिनी पर्ससीननेटने करण्यात येणारी मासेमारी अन्यायकारकरित्या बंद केल्यामुळे आज उपासमारीची वेळ आली आहे. नौकामालकांची आर्थिक स्थिती खालावल्याने त्यांच्याकडे हा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठीही पैसा हाती राहिलेला नाही. त्यामुळे अनेक मालक नौका विकून कर्ज फेडण्यासाठी धडपडत आहेत, तर अनेकांनी कमी किमतीमध्ये नौका विकल्या. त्यामुळे भवितव्य अंधारमय झाले असून, त्याचा विचार कोण करणार.
- खलिफ तांडेल, मच्छिमार

Web Title: Fishermen shut for four months; Navigator hovering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.