मच्छिमारांना बॉम्बने उडवण्याची धमकी
By admin | Published: December 24, 2015 11:28 PM2015-12-24T23:28:48+5:302015-12-24T23:50:15+5:30
‘हायस्पीड’विरुद्ध तक्रार : हायस्पीड व सिंधुदुर्गातील मच्छिमार यांच्यात संघर्षाची नवी ठिणगी
मालवण : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर घुसखोरी करणारे कर्नाटक मलपी बंदरातील हायस्पीड आणि सिंधुदुर्गातील ट्रॉलर्स गिलनेटधारक मच्छिमार यांच्यातील संघर्षात वादाची नवी ठिणगी पडली आहे. सर्जेकोट येथील ट्रॉलर्स व्यावसायिक गोपीनाथ तांडेल यांना व त्यांच्या कुटुंबीयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत तांडेल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, गेल्या दोन महिन्यांत पकडण्यात आलेल्या सात हायस्पीड मालकांसह अन्य दोघांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तांडेल यांनी दिलेल्या तक्रारीत, ‘तुमच्या कारवाईमुळे आमच्या बोटींना ४२ लाखांचा दंड झाला. तुम्हाला बघून घेऊ. तुमच्या घरात बॉम्ब ठेवून तुम्हाला उडवून देऊ’, अशी धमकी शनिवारी सकाळी दोनवेळा त्यांना मोबाईलवर देण्यात आली आहे. यापूर्वीही एका मच्छिमाराला ‘समुद्रातच तुमच्या बोटी हायस्पीड बोटीने उडवून लावू’, अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे या धमकी देणाऱ्या दोघांच्या नंबरवरून, तसेच २६ आॅक्टोबर व १७ डिसेंबर यावेळी पकडण्यात आलेले सात हायस्पीड यांनीच ही धमकी दिली, असे सांगत या सर्वांपासून आपणास, मच्छिमारांना व कुटुंबीयांच्या जीवितास धोका आहे, अशी तक्रार देण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)