मच्छीमारांची जाळी रिकामीच
By admin | Published: August 11, 2015 12:17 AM2015-08-11T00:17:51+5:302015-08-11T00:17:51+5:30
यंत्रनौका वाढल्या : दीड दशकांपूर्वीपासूनच मत्स्य दुष्काळ --दुष्काळच्या नौकेवरील मासेमारी भाग-१
राजेश जोष्टे- खेर्डी यांत्रिक नौकांची वाढती संख्या, खाडी व समुद्र खरवडून काढण्याच्या आधुनिक घातक पद्धती तसेच वाढत्या प्रदूषणामुळे एकेकाळी सागरी मत्स्योत्पादनाची गाठलेली ४.६ लाख टनाची क्षमता धुळीस मिळाली. यामुळे दीड दशकाच्या आधीपासूनच मत्स्य दुष्काळाच्या संकटाने घेरले आहे.
कोकणचा ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, ३ हजार २०० किलोमीटर लांबीच्या नद्या आणि ३.१ लाख हेक्टर क्षेत्रात तळी व जलाशय यामध्ये मत्स्योत्पादन होते. सागरी मत्स्य उत्पादनाची क्षमता ४.६ लाख टन, तर गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन २५ हजार टनांच्या आसपास आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा मासळीच्या जाती महाराष्ट्रातच असल्याचे सांगितले जाते. याचमुळे की काय परराज्यातील ट्रॉलर बोटींचा धिंगाणा इकडे सुरु असतो. येथील पापलेट, बोंबिल, सुरमई, कोळंबी यासह अनेक छोटे मासेही चविष्ठ आणि दूरदेशींच्या खवय्यांसाठी आपलंस करणारे ठरले आहेत.
१९८३ च्या गणनेनुसार १३ हजार मासेमार बोटी होत्या. यापैकी ६ हजार ५९१ बोटी १ टनापेक्षा अधिक मत्स्य क्षमतेच्या होत्या. यांत्रिकी नौकांची संख्या ४ हजार ६३५ होती. गत तीन दशकात प्रगत व अतीप्रगत बोटींच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यातच गाळाने होरलेल्या खाड्या समुद्रकिनारे, रासायनिक सांडपाणी सोडून मत्स्योत्पादनाची अपरिमित हानी करणारे कारखाने, पर्ससिननेट या व अशा कारणांनी मत्स्य जीवनावर संकट ओढवले आहे.
दुर्मीळ मत्स्य संपदा ज्या खाड्यातून वाढते, मत्स्यजीवांचे जिथे प्रजनन होते, त्याच ठिकाणी घातक रसायनांचे सांडपाणी सोडण्यात आल्याने अनेक मत्स्यजाती कायमस्वरुपी संपुष्टात आल्या आहेत. तर दुसरीकडे मासे चवीच्या दृष्टीनेही आपल्या लौकिकापासून दूर जात आहेत. एकीकडे कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना कोकणचे कोकणत्वही अबाधित ठेवता आलेले नाही. हेच सत्य यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. १९८३ च्या गणनेनुसार मासेमारी बोटींची संख्या घटण्याचे कारण व प्रगत आणि अतिप्रगत तंत्राची पध्दती वापरात आणली जात असल्यानंतरचा प्रश्न कायमच आहे.
आक्रमण थोपवावे लागेल...
कोकणचा किनारा ७२० किलोमीटरचा.
३ हजार २०० किलोमीटर लांबीच्या नद्या.
मत्स्य उत्पादनाची क्षमता घटत असल्याचे चित्र.
परराज्यातील ट्रॉलर्स बोटींचा कोकण किनारपट्टीवर धिंगाणा सुरू असल्याचा दावा.
आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मासळीच्या जाती महाराष्ट्रातच अधिक असल्याची माहिती.