मिठमुंबरीत मच्छिमारी नौका उलटली
By admin | Published: November 8, 2016 11:34 PM2016-11-08T23:34:31+5:302016-11-09T00:55:17+5:30
चौघांना जीवदान : नौकेसह जाळ्याचे पाच लाख रूपयांचे नुकसान
देवगड : तालुक्यातील मिठमुंबरी-बागवाडी येथील नारायण तारी यांची चिंंतामणी ही मच्छिमारी नौका सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमाराम तारामुंबरी नस्त या ठिकाणी खडकात अडकून समुद्रात उलटली. यामुळे नौकेवरील चौघे मच्छिमार समुद्रात बुडाले. सुदैवाने त्यांनी पोहत तारामुंबरी समुद्रकिनारा गाठल्याने मोठा अनर्थ टळला.
या दुर्घटनेत नौकेचे (पात) व जाळ्यांचे मिळून पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. मिठमुंबरी बागवाडी येथील नारायण हरी तारी यांची त्यांच्या पत्नीच्या नमिता तारी यांच्या नावावरती मच्छिमार नौका आहे. ही नौका मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनाऱ्यावरून सोमवारी सायंकाळी ४.५0 च्या सुमारास मच्छिमारीसाठी समुद्रात गेली होती. या नौकेवरती नारायण हरी तारी (४०) यांच्यासह प्रथमेश प्रताप नेसवणकर (२४), हर्षद नारायण तारी (२०, सर्व, राहणार मिठमुंबरी बागवाडी) तर संतोष जगन्नाथ मुणगेकर (४५, रा. कातवण) हे नौकेवरील खलाशी मच्छिमारीस गेले होते.
मच्छिमारी केल्यानंतर घरी परतत असतानाच तारामुंबरी स्मशानभूमीनजीक नस्त याठिकाणी रात्री १०:.३० च्या सुमारास महाकाय खडकामध्ये नौका आदळून समुद्रात उलटली. या दुर्घटनेत नौकेला तडे जाऊन नौका फुटली. तसेच खलाशी समुद्रात फेकले गेले. नौकेतील चौघांनाही पोहता येत असल्याने तारामुंबरी समुद्रकिनारी ते सुखरुप पोहोचले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. (प्रतिनिधी)
पाच लाख रूपयांची हानी
या घटनेची माहिती नारायण धुरी यांनी तारामुंबरी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर चिंंतामणी ही नौका समुद्रकिनारी आणण्यास तारामुंबरी ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र रात्र असल्याने ही नौका मंगळवारी ग्रामस्थांनी समुद्रकिनारी आणली. नौकेचे पूर्णत: नुकसान झाले असून नौकेवरील जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या नौका दुर्घटनेमध्ये नारायण तारी यांचे नौका व जाळी मिळून पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.