मासळीचे दर कडाडले, वादळी वाऱ्यांचा फटका : मत्स्य व्यवसायावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:08 AM2019-04-27T11:08:07+5:302019-04-27T11:09:36+5:30
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्याने मत्स्य व्यवसायाला मोठा फटका सहन करावा लागला. पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात किरकोळ मासळीच मिळत असल्याने स्थानिक मच्छी मार्केटमध्ये मासळीचे दरही कडाडले आहेत. त्यामुळे मत्स्य खवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्याने मत्स्य व्यवसायाला मोठा फटका सहन करावा लागला. पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात किरकोळ मासळीच मिळत असल्याने स्थानिक मच्छी मार्केटमध्ये मासळीचे दरही कडाडले आहेत. त्यामुळे मत्स्य खवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
कोकण किनारपट्टी भागात रात्रीच्यावेळेस होणाऱ्या पर्ससीन, एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे गेले तीन-चार महिने स्थानिक मच्छिमारांना मासळी मिळणेच कठीण बनले होते. मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात इंधनावर खर्च होत असताना मासळीपासून म्हणावे तसे उत्पन्नच मिळत नसल्याने अनेक मच्छिमारांनी नौका समुद्रातच उभ्या केल्याचे चित्र दिसून आले.
गेल्या काही दिवसांत स्थानिक मच्छिमारांना मुबलक किमती मासळी उपलब्ध होत होती. मात्र अचानक वादळी वाऱ्यामुळे समुद्रातील वातावरणात बदल होऊन त्याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला असून, मत्स्य खवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. बुधवारी या वाऱ्याचा जोर काहीसा कमी झाल्याचे मच्छिमारांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काही दिवसांत चांगली मासळी मिळेल, अशी अपेक्षा मच्छिमारांमधून व्यक्त केली जात आहे.
मत्स्य खवय्ये नाराज
सध्या पर्यटन हंगाम तसेच सुटीचा कालावधी असल्याने मुंबईकर चाकरमानी, पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. यात किमती मासळीच्या दरात वाढ झाल्याने हॉटेलमधील मत्स्याहारी थाळ्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मत्स्य खवय्यांकडून सुरमई, पापलेट, बांगडा आदी मासळीला पसंती असल्याने त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे मत्स्य खवय्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.