सर्जेकोट बंदरात मासेमारी नौकेला लागली आग, लाखोंचे नुकसान; नेमकं कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 05:23 PM2022-03-15T17:23:43+5:302022-03-15T17:24:19+5:30
समुद्रात उभ्या असलेल्या नौकेला अचानक आग लागली. नौकेला आग लागल्याचे दिसताच स्थानिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य करत आगीवर नियंत्रण मिळवले.
मालवण : सर्जेकोट बंदरात मासेमारी नौकेला आग लागल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत नौकेचे सुमारे ६ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सर्जेकोट येथील नितीन नारायण परुळेकर यांची 'कृष्णछाया' ही नौका समुद्रात मासेमारी करून आज सकाळी बंदरावर आली होती. एका खलाशाची तब्येत ठीक नसल्याने नौका बंदरात उभी करत अन्य खलाशांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या दरम्यान समुद्रात उभ्या असलेल्या नौकेला अचानक आग लागली. नौकेला आग लागल्याचे दिसताच स्थानिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र नौकेचे मोठे नुकसान झाले.
मत्स्य विभागाच्या वतीने दुर्घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.