सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प, मच्छिमारांना फटका
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 14, 2022 12:26 PM2022-09-14T12:26:04+5:302022-09-14T12:26:35+5:30
पुन्हा वादळी वारे वाहू लागल्याने मासेमारीवर परिणाम
सिंधुदुर्ग : वादळी वारे वाहू लागल्याने त्याचा फटका मच्छिमारांना बसला आहे. त्यामुळे अनेक नौका बंदरांमध्ये नांगरावर उभ्या असून, मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
गेल्या काही दिवसांत अचानक वातावरणात बदल झाला. समुद्र खवळल्यामुळे मासेमारी बंद झाली होती. पावसाळ्यानंतर हळूहळू वातावरण स्थिर होत असतानाच शनिवारपासून पुन्हा वादळी वारे वाहू लागल्याने मासेमारीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आधीच समुद्रात जाऊनही मासळी मिळत नसल्याने मच्छिमार हैराण झाले आहेत. आता वाऱ्यामुळे मासेमारीच ठप्प झाल्याने नौका बंदरात उभ्या ठेवण्यात आल्या आहेत.
पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर मासे खोल समुद्रातून किनाऱ्याच्या दिशेने येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. बिघडलेले वातावरण पूर्वीसारखेच होईल, अशा आशेवर मच्छिमार असतानाच पुन्हा सोसाट्याचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे मच्छिमार हवालदिल झाले आहेत. नौका पूर्ण बंदच असल्याने मच्छिमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.