पाच कोटी दहा लाखांचा निधी अखर्चित

By admin | Published: May 10, 2016 11:02 PM2016-05-10T23:02:32+5:302016-05-11T00:09:53+5:30

बांधकाम समिती सभेत उघड

Five crore ten lakh funding | पाच कोटी दहा लाखांचा निधी अखर्चित

पाच कोटी दहा लाखांचा निधी अखर्चित

Next



सिंधुदुर्गनगरी : सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाअखेर जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नातील २२ कोटी ९९ लाख ५० हजारांपैकी १७ कोटी ८९ लाख ४५ हजार ९८६ लाख निधी विविध विभागांनी आपापल्या योजनांवर खर्च केला आहे, तर तब्बल पाच कोटी दहा लाख चार हजार १४ रुपये एवढा निधी अखर्चित राहिला असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी वित्त समिती सभेत उघड झाली.
अध्यक्ष, समाजकल्याण, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, आदी विभाग निधी १०० टक्के खर्च करण्यास कमी पडले, असे सांगून सभापती दिलीप रावराणे यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित खातेप्रमुखांना खडे बोल सुनावले. गेल्या तीन वर्षांत सरासरीपेक्षा निधी खर्चात मागे असणाऱ्या विभागांना आगामी अंतिम सुधारित अर्थसंकल्पात निधीच वाढवून न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभापतींसमवेत सर्व सदस्यांनी घेतला.
जिल्हा परिषद वित्त व बांधकाम समितीची मासिक सभा या विभागाचे सभापती दिलीप रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवळ, सुभाष नार्वेकर, समिती सचिव (पान १ वरून) तसेच लेखा व वित्त अधिकारी मारुती कांबळी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे दोन दिवसांपूर्वीच मार्च एंडिंग क्लोज केल्याची घोषणा वित्त अधिकारी मारुती कांबळी यांनी केली व निधी खर्च व अखर्च राहिलेल्यांची आकडेवारी सभागृहात सादर केली. मारुती कांबळी म्हणाले, २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषद स्व उत्पन्नातून विविध विभागांना २२ कोटी ९९ लाख ५० हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यापैकी या आर्थिक वर्षात १७ कोटी ८९ लाख ४५ हजार ९८६ रुपये खर्च झाले. त्यामुळे पाच कोटी दहा लाख रुपये अखर्चित राहिल्याचे सभागृहात सांगितले. अखर्चित राहिलेल्यांमध्ये जिल्हा परिषद बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण, आदी विभागांचा समावेश असून, या सर्व विभागांना निधी अखर्चित राहिल्याची कारणे विचारली. सुरुवातीला समाजकल्याण विभागाचा ४२ लाख ४८ हजार ९६० रुपये शिल्लक राहिलेल्याचा खुलासा करण्यात आला.
अपंगांवर खर्च करण्यात येणारा ३ टक्के निधी उशिराने प्राप्त झाल्याने हा निधी अखर्चित राहिल्याचे सांगितले. बांधकाम विभागाचा प्राप्त तीन कोटी १७ लाखांपैकी एक लाख २७ हजार अखर्चित राहिल्याबाबत सभापती दिलीप रावराणे यांनी नाराजी व्यक्त केली. मी जरी या विभागाचा सभापती असलो तरी सर्वांना समान न्याय या भावनेतून मी काम करणारा आहे, असे सांगत सर्वच विभागप्रमुखांना सभापती रावराणे यांनी फटकारले. (प्रतिनिधी)

यापुढे निधीला कात्री
गेल्या तीन वर्षांत सरासरीपेक्षा कमी निधी खर्च करणाऱ्या विभागांना पुढील अंतिम सुधारित अर्थसंकल्पात निधीला कात्री लागणार असल्याचे सूतोवाच सभापती दिलीप रावराणे यांनी करत तसा निर्णयही घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वित्त व लेखा अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली.

सदस्याने १३ वेळा बदलले काम
सदस्यांना स्वनिधीचे वाटप वेळेत केले जाते. त्या अनुषंगाने काही सदस्यांकडून कामे सुचविताना दिरंगाई होते. एका सदस्याने तर एक काम चक्क १३ वेळा बदलले. काम करण्याचे त्राण राहत नाही, असे वित्त अधिकाऱ्यांनी सभागृहात स्पष्ट केले. यावर सदस्य सुरेश ढवळ यांनी अशा पद्धतीने वागणाऱ्या सदस्यांना कामे एकदाच सादर करण्याच्या सूचना द्याव्यात, असे सुचविले. मात्र, वित्त अधिकाऱ्यांनी लागलीच ‘आपण सभागृहात बोलताय म्हणून बोलताय’ असे ढवळ यांना हात जोडून सांगताच सभागृहात हशा पिकला.

Web Title: Five crore ten lakh funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.