कोकणात पाच दिवस अतिवृष्टी!
By admin | Published: July 25, 2016 12:46 AM2016-07-25T00:46:41+5:302016-07-25T00:46:41+5:30
वेधशाळेचा अंदाज : सावधानतेचा इशारा
रत्नागिरी : गेल्या महिनाभरापासून मुसळधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी रात्री धरलेली संततधार रविवारी दुपारपर्यंत कायम होती. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, कोकणात येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असून, ७ ते ११ सेंटी मीटर पाऊस पडेल, असा धोक्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
२० जून २०१६ पासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अत्यल्प वेळ पावसाने विश्रांती घेतली. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने रात्रीही विश्रांती घेतली नाही. रविवारी दुपारपर्यंत पावसाने जोरदार दणका दिला. त्यानंतर सायंकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या पाच दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास आधीच धोका पातळीपर्यंत आलेल्या नद्या ही पातळी ओलांडून पूरपातळीही ओलांडण्याची भीती व्यक्त होत आहे. तसे झाले तर अर्जुना, जगबुडी, कोदवली या नद्यांना पूर येण्याची शक्यता असून, परिसरातील भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्याचबरोबर नागरी वस्तीतही पाणी घुसण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर गेल्या महिनाभरात कमी न झाल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. शेतांमध्ये पाणी भरल्यास रोपे कुजण्याची भीतीही आहे. (प्रतिनिधी)