पाच शिकारी अटकेत, शिरगांव येथे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:46 PM2020-10-16T12:46:55+5:302020-10-16T12:51:19+5:30
Crime News, shindhudurgnews देवगड तालुक्यात शिकारीचा छंद असलेल्या कुडाळ व मालवण तालुक्यांतील पाचजणांना शिरगांव तपासणी नाक्यावर देवगड पोलिसांनी पकडून कारवाई केली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांची शिकार होत असल्याचे यावरून सिद्ध झाले असून देवगड पोलिसांच्या या कारवाईने वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
देवगड : देवगड तालुक्यात शिकारीचा छंद असलेल्या कुडाळ व मालवण तालुक्यांतील पाचजणांना शिरगांव तपासणी नाक्यावर देवगड पोलिसांनी पकडून कारवाई केली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांची शिकार होत असल्याचे यावरून सिद्ध झाले असून देवगड पोलिसांच्या या कारवाईने वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांची शिकार होत असल्याचे देवगड पोलिसांनी केलेल्या कारवाईने उघड झाले आहे. नांदगांवमार्गे देवगडच्या दिशेने संभाजी भिवाजी परब, शंकर मनोहर पालव, वीरेंद्र गणपत पालव (सर्व रा. अणाव), गितेश संतोष चव्हाण (रा. देवली) व गुरूदत्त वैकुंठ खोबरेकर (रा. कवठी) हे पाचहीजण गाडीने बुधवारी पहाटे १.३० च्या सुमारास शिकार करण्याचा उद्देशाने जात होते. मात्र, जात असताना शिरगांव तपासणी नाक्यावर पोलिसांनी त्यांचा बेत उधळवून लावला.
गाडी थांबवून तपासणी करताना पोलिसांना गाडीत २० हजार रुपये किमतीची बंदूक व ८४० रूपये किमतीची काडतुसे सापडली. पोलिसांनी ती ३ लाख रुपये किमतीच्या चारचाकीसह ताब्यात घेतली आहेत. संशयितांविरूद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५(१) (१-ब) व भादवि कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांची शिकार
या कारवाईमुळे देवगड तालुक्यात स्थानिकांबरोबरच इतर तालुक्यांतील शिकारीही शिकारीसाठी येऊन मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची शिकार करीत असल्याचे उघड झाले आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या शिकारीबद्दल वन्यजीवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.