विजेचा धक्का लागून पाच गुरे जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 08:02 PM2019-06-08T20:02:59+5:302019-06-08T20:04:22+5:30
कुडाळ तालुक्यात बुधवारी रात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाव येथे विद्युततारा तुटून पडल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोनवडे गावातील गुरे चरण्यासाठी आली असता त्यातील पाच गुरांना विद्युत तारांचा धक्का लागून ही पाचही गुरे जागीच मृत्युमुखी पडली.
कुडाळ : तालुक्यात बुधवारी रात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाव येथे विद्युततारा तुटून पडल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोनवडे गावातील गुरे चरण्यासाठी आली असता त्यातील पाच गुरांना विद्युत तारांचा धक्का लागून ही पाचही गुरे जागीच मृत्युमुखी पडली. ही गुरे सोनवडे बळीचे टेंबमधील शेतकरी सुधीर शंकर आसोलकर यांची होती. त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोनवडे बळीचे टेंब येथील शेतकरी सुधीर आसोलकर नेहमी गुरे चरविण्यासाठी येथे घेऊन येतात. बुधवारी मध्यरात्री कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी झाडे तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. बांव गावातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी दिलेल्या विद्युत पुरवठ्याच्या खांबावरील विद्युततारा जमिनीवर कोसळल्या होत्या. याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुधीर आसोलकर यांनी आपली गुरे चरविण्यासाठी तेथे आणली होती.
गुरे चरत असताना विद्युततारा तुटलेल्या ठिकाणी ती गेली आणि एका मागोमाग पाच गुरांना विद्युत तारांचा धक्का लागला. त्यात पाचही गुरे मृत्युमुखी पडली. यामध्ये गाभण चार म्हशी, गाभण एक गाय आणि छोटे वासरू होते. मात्र, तीन गुरांना सुधीर आसोलकर यांनी वाचविले. ही घटना समजताच ग्रामस्थांनी धाव घेतली तसेच विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर विद्युत पुरवठा बंद केला. या दगावलेल्या म्हशींसोबतच जंगलातील कोल्हासुद्धा विद्युत तारांचा धक्का लागून मृत्युमुखी पडला होता.
यावेळी बांव सरपंच नागेश परब, ग्रामसेविका मसके, सोनवडे तंटामुक्ती अध्यक्ष महिपाल धुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पशुसंवर्धनचे मुळीक, डॉ. चव्हाण, डॉ. खवणेकर यांनी मदतकार्य करून या घटनेचा पंचनामा केला. या गुरांचा सुमारे दोन लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा पंचनामा करण्यात आला.