पाच महिन्यांत सत्तावीस लाखांची अवैध दारू जप्त
By admin | Published: September 17, 2016 10:53 PM2016-09-17T22:53:43+5:302016-09-18T00:02:30+5:30
उत्पादन शुल्क विभागाची माहिती : ३३९ गुन्हे, ६८ आरोपींना अटक
कणकवली : राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग विभागातर्फे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत २७,५६,०३५ रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी एकूण ३३९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ६८ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सिंधुदुर्ग अधीक्षक संतोष झगडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली.
सिंधुदुर्ग हा जिल्हा गोव्याच्या सीमेवर लागून असल्याने गोव्यात कथितरीत्या उत्पादन केल्या जाणाऱ्या दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. गोव्यातून सिंधुदुर्गमार्गे चोरट्या मार्गाने अशी दारू आणली जाते. त्यासाठी सिंधुदुर्ग हा प्रवेशद्वार ठरतो. त्यामुळेच उत्पादन शुल्क खात्याने अवैध दारूच्याविरोधात या जिल्ह्यात आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच गेल्या पाच महिन्यांत जवळपास साडेसत्तावीस लाखांची अवैध दारू जप्त करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अवैध दारूच्या विरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसारच एप्रिल २०१६ ते आॅगस्ट २०१६ दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
अवैध मद्य विक्रीविरुद्ध कारवाई अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी अवैध दारूबाबत तक्रार नोंदवावी याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन व्हॉट्सअॅप नंबर सुरू केला
आहे.
संपूर्ण राज्याकरिता हा एकच व्हॉट्सअॅप नंबर सुरू राहणार आहे. या क्रमांकावर केलेली अवैध मद्य विरोधातील तक्रार आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र-मुंबई यांच्याकडे नोंद होणार असून, त्याची वरिष्ठ पातळीवर तत्काळ दखल घेतली जाणार आहे. (वार्ताहर)
तक्रारीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक
नागरिकांनी अवैध दारूच्या विरोधात तक्रार असल्यास त्यांनी ८४२२००११३३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेशाद्वारे, लेखी स्वरूपात, फोटो किंवा चित्रफितीच्या स्वरूपात पाठवावी, असे आवाहन सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांनी केले आहे.