सिंधुदुर्गात आणखी पाच कोरोना पाॅझिटिव्ह सापडले, रुग्ण संख्या पोहोचली 53वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:11 PM2020-05-30T23:11:38+5:302020-05-30T23:11:56+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात आज प्राप्त 31 कोरोना तपासणी अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आढळले
सिंधुदुर्ग: जिल्हा सामान्य रुग्णालयात आज प्राप्त 31 कोरोना तपासणी अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आढळले असून, तर 26 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 53 पोहोचली आहे. शुक्रवारी एका दिवसात 24 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र शनिवारी या संख्येत भर पडली असून, ती संख्या 53 वर पोहोचली आहे. यातील सात रुग्ण यापूर्वीच बरे होऊन घरी गेले आहेत. कोकणातील रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोनाने गंभीर रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी जिल्ह्यात एकूण २४ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८ वर पोहोचली होती.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनची सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक अंमलबजावणी सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मर्यादित होती. मात्र मे महिन्यात प्रवासावरील निर्बंध शिथिल होऊन मुंबई-पुण्यावरून येणाऱ्यांची वर्दळ वाढल्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २४ होती. मात्र शुक्रवारी एकाच दिवशी जिल्ह्यात सुमारे २४ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८ झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, वैभववाडी, देवगड आदी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडले. तसेच देवगडमध्ये काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सध्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४८ झाली असून, ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती उपचारांसाठी जिल्ह्याबाहेर गेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे ३९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.