नगराध्यक्ष पदासाठी पाच नामनिर्देशनपत्र दाखल
By admin | Published: November 19, 2015 10:21 PM2015-11-19T22:21:23+5:302015-11-20T00:09:38+5:30
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूक : माघारीनंतर २३ ला होणार चित्र स्पष्ट
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष पदासाठी पाच नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. काँग्रेस पुरस्कृत वाभवे-वैभववाडी विकास आघाडीतर्फे रवींद्र रावराणे यांनी दोन व दीपा दीपक गजोबार तर भाजपा शिवसेना युती पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीतर्फे सुचित्रा रत्नाकर कदम व रोहन जयेंद्र रावराणे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली असून ती सर्व वैध ठरली आहेत. सोमवार २३ रोजी नामनिर्देशनपत्र माघारीनंतर नगराध्यक्ष निवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नगरपंचायतीची घोषणा झाल्यापासून काँग्रेसने नगराध्यक्ष म्हणून प्रोजेक्ट केलेल्या संजय चव्हाण यांनी मात्र नामनिर्देशनपत्र दाखल केलेले नाही.काँग्रेस पुरस्कृत वाभवे-वैभववाडी विकास आघाडीकडे नऊ नगरसेवकांसह बहुमत आहे. तर भाजपा शिवसेना पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीकडे आठ नगरसेवक आहेत. सकाळी पावणे बाराच्या सुमारास भाजपा शिवसेना पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीच्या सुचित्रा रत्नाकर कदम व रोहन जयेंद्र रावराणे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. आर. गावीत यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केली. यावेळी शिवसेना नेते जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, सज्जनराव रावराणे, अशोक रावराणे, नंदू शिंदे, मंगेश लोके, नगरसेवक संतोष माईणकर, संतोष पवार, रवींद्र तांबे, सुप्रिया तांबे, तसेच रत्नाकर कदम, रणजित तावडे, सुनील रावराणे विवेक रावराणे, संतोष बोडके, बाबू माईणकर आदी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास काँग्रेस पुरस्कृत वाभवे-वैभववाडी विकास आघाडीतर्फे रवींद्र रावराणे (दोन) व दीपा दीपक गजोबार यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्र दाखल केली.
यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, शुभांगी पवार, नगरसेवक संजय चव्हाण, समिता कुडाळकर, संपदा राणे, अक्षता जैतापकर तसेच माजी सभापती अरविंद रावराणे, माजी कृषी सभापती संदेश सावंत, तुळशीदास रावराणे, सुरेश सावंत आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी दुपारी दोन वाजता दाखल नामनिर्देशनपत्रांची उमेदवारांच्या उपस्थितीत छाननी केली. दाखल पाचही नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आली. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची सोमवार २३ पर्यंत मुदत आहे. त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)