जिवंत रानडुकरांची तस्करी करणारे पाच जण ताब्यात
By अनंत खं.जाधव | Published: December 10, 2023 07:03 PM2023-12-10T19:03:29+5:302023-12-10T19:03:52+5:30
सावंतवाडी व सांगली येथील वनविभागाची संयुक्त कारवाई: मुख्य संशयित सांगलीचा
सावंतवाडी : तब्बल १० जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या सांगली येथील रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सावंतवाडी वनविभागाला यश आले आहे. ही कारवाई रविवारी सावंतवाडी व सांगली वनविभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली. वनविभागाकडून तब्बल ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील रोहित कोळी याने रानडुक्कर आणि साळींदर या वन्य पाण्याची शिकार करून तो व्हिडिओ कोळी यानेच शिकारवाला या इंस्टाग्राम पेजवर व्हायरल केली होता. त्याचा शोध घेत असताना हे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांची निर्दयपणे शिकार करून इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या रोहित कोळी नामक आरोपीला वन विभागाने सांगली मधून ताब्यात घेतले. रोहित कोळी शिकारवाला या इन्स्टाग्राम अकाउंटवर रानडुक्कर तसेच साळींदर यांची शिकार करून व्हिडिओ व्हायरल केला होता याची माहाती वनविभागाला मिळाल्यानंतर आरोपी रोहित कोळी चा शोध सावंतवाडी वनविभागाकडून सुरू करण्यात आला
त्यावेळी रोहित कोळी हा सांगली येथील असल्याचे निष्पन्न झाले. या संशयित आरोपीचा वनविभागाकडून ठावठिकाणा शोधला त्यावेळी हा संशयित सांगली येथेच राहात असल्याचे स्पष्ट झाले.यासाठी सांगली वनविभागाकडून ही मदत करण्यात आली. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी वन विभागाने फिरते पथक सांगली यांची मदत घेतली व तसा सापळा ही रचण्यात आला व त्यानुसार सोलापूर-सांगली महामार्गावर रोहित कोळी व इतर 5 सशयित आरोपी यांना 10 जिवंत रानडुकरांसह संयुक्त कारवाई करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
या कारवाई मुळे जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सावंतवाडी व सांगली येथील वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.ही कारवाई मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर(प्रा.) श्री.आर. एम. रामनुजम, उपवनसंरक्षक सावंतवाडी एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, फिरतेपथक सांगली वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, महादेव गेजगे, प्रकाश रानगिरे, वाहनचालक रामदास जंगले तसेच मेळघाट सायबर सेलचे वनरक्षक आकाश सारडा यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.
नावाबाबत गृप्तता
सावंतवाडी वनविभागाकडून मुख्य संशयित आरोपीचे नाव जाहीर केले असले तरी अन्य आरोपीचे नाव तसेच कुठे शिकार केली कोणाची बंदुक वापरली याबाबत अद्याप पर्यत जाहीर वाच्यता केली नसून तपास कामात अडथळा येईल म्हणून ही नावे गृप्त ठेवण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे