मारहाणप्रकरणी वनरक्षकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 06:28 PM2021-02-23T18:28:16+5:302021-02-23T18:30:20+5:30
ForestDepartment Crimenews Sindhudurga -कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील कातकरी आदिवासी समाजातील महिला व पुरुषांना मारहाण केल्याप्रकरणी वनरक्षक, वनपाल यांच्यासह पाच वनाधिकारी व कर्मचारी यांच्यावर रविवारी रात्री ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानुसार, त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट येथील कातकरी आदिवासी समाजातील महिला व पुरुषांना मारहाण केल्याप्रकरणी वनरक्षक, वनपाल यांच्यासह पाच वनाधिकारी व कर्मचारी यांच्यावर रविवारी रात्री ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानुसार, त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कातकरी आदिवासी समाजातील व्यक्तींना वनरक्षकांनी केलेल्या मारहाणप्रकरणी ॲड. सुदीप कांबळे यांना अत्याचारित लोकांकडून माहिती मिळाली. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रमोद कासले, तालुकाध्यक्ष संजय जाधव यांना घेऊन फोंडाघाट येथे कातकरी आदिवासी यांची भेट घेतली होती. तसेच मारहाणीची माहिती घेतल्यानंतर या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करून अखंड लोकमंचचे नामानंद मोडक, शैलजा कदम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांना घेऊन ॲट्रॉसिटी ॲक्टखाली गुन्हा नोंद करण्याची मागणी कणकवली पोलीस ठाण्यात केली होती.
या मागणीनुसार कणकवली पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी या घटनेचा सखोल तपास करून अत्याचारित कातकरी आदिवासी समाजातील व्यक्तींच्या तक्रारीनुसार रविवारी गुन्हे दाखल केले. त्यामध्ये संशयित आरोपी वनपाल शशिकांत दत्ताराम साटम, संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छिंद्र श्रीकृष्ण दराडे, सत्यवान सहदेव कुबल यांचा समावेश आहे.
या मारहाणप्रकरणी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरसकर, जिल्हा महिला संघटक गीतांजली कामत, कणकवली तालुका निरीक्षक निसार शेख यांनीही या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.
तपासी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी या गुन्ह्यातील पाच जणांना सोमवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी सर्व आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली .